Mumbai Crime : महिलांची छेड काढणाऱ्या सराईत गुन्हेगाराला माटुंगा पोलिसांकडून अटक
दादर, माटुंगा, सायन, वडाळा, परळ या सर्व भागात पोलिसांनी जागता पहारा ठेवला. सतत दोन महिने अहोरात्र पोलीस त्याच्या शोधात डोळ्यात तेल घालून जागे राहिले आणि या आरोपीचा शोध सुरू ठेवला. मात्र एक दिवस रात्रीच्या वेळेस आरोपीच्या गाडीचा नंबर पोलिसांच्या नजरेस पडला आणि त्याच्या घरच्या पत्त्यावरुन अटक केली.
मुंबई : रात्रीच्या वेळेस रस्त्यावरुन एकट्या जाणाऱ्या महिलांच्या शरीराला स्पर्श करुन त्यांची छेड करुन पसार होणाऱ्या सराईत गुन्हेगाराला माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे. याला अटक करण्यासाठी पोलिसांनी सतत दोन महिने रात्रीच्या वेळेस जागता पहाराही दिला. मात्र हा पोलिसांना नेहमी तुरी देऊन पसार होत होता. अखेर पोलिसांनी सायनच्या कोक्री आगार परिसरातून आरोपीला अटक केली.
रस्त्यावरुन एकट्या जाणाऱ्या महिलांच्या शरीराला स्पर्श करुन आपल्या दुचाकीवर हा पसार होऊन जायचा. एक तर महिला दुचाकीवरून पडली आणि तिचा जीव अगदी थोडक्यात बचावला. या महिलेसोबत या विक्षिप्त आरोपीने तर 2 वेळा हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे.
विशेष करून रात्री 11 ते 11.30 च्या सुमारास रहदारी कमी असलेल्या ठिकाणी एकटी महिला पाहून आरोपीकडून हे कृत्य दर 4 ते 5 दिवसांनी केलं जात होतं. काही महिलांसोबत तर त्याने दोन वेळा हे कृत्य केलं आहे. एखाद्या दिवशी हे कृत्य करून परत तीन ते चार दिवस हा नराधम शांत बसायचा जेणेकरून पकडले जाऊ नये. दुसरीकडे आपली बदनामी होऊ नये या भीतीने महिला पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही देत नव्हत्या आणि याचाच फायदा हा वारंवार घेत होता.
असं म्हणतात की "वाईटाचा अंत निश्चित आहे" आणि असंच काहीसं या आरोपी बरोबरसुद्धा झालं. माटुंगा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका महिले बरोबर यांनी हेच कृत्य केलं. या महिलेने धाडस दाखवत पोलिसात या घटनेची तक्रार केली. पोलीसांनी सुद्धा क्षणाचाही विलंब न करता या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हा नोंदवला आणि आपले सूत्र हलविण्यास सुरुवात केली.
पोलीस उपनिरीक्षक संदीप अहिरराव, पोलीस हवालदार संदीप शिंदे आणि पोलीस नाईक धर्मेंद्र जुवाटकर हे पथक तयार करण्यात आलं आणि या पथकावर या आरोपीला पकडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक संदीप अहिरराव यांनी युद्धपातळीवर तपास सुरू केला. दादर, माटुंगा, सायन, वडाळा, परळ या सर्व भागात पोलिसांनी जागता पहारा ठेवला. सतत दोन महिने अहोरात्र पोलीस त्याच्या शोधात डोळ्यात तेल घालून जागे राहिले आणि या आरोपीचा शोध सुरू ठेवला. सीसीटीव्हीचीसुद्धा मदत घेण्यात आली मात्र रात्रीची वेळ असल्यामुळे आणि बाइक अगदी वेगाने पळवल्यामुळे सीसीटीव्ही मधूनसुद्धा पोलिसांना काही विशेष मदत झाली नाही.
मात्र एक दिवस रात्रीच्या वेळेस आरोपीच्या गाडीचा नंबर पोलिसांच्या नजरेस पडला आणि याच्या आधारे आरोपीचा पत्ता शोधत पोलिसांनी त्याला कोक्री आगार, सायन या ठिकाणाहून अटक केली. कलम 279,337,354 354 (ड) 134 मोटार वाहन कायद्यानुसार या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ज्या महिलांना बरोबर असे प्रकार घडले असतील त्या महिलांनी पुढे येऊन तक्रार करावी, असं आवाहन पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी केलं आहे.
सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस उपायुक्त (परिमंडळ 4) विजय पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त भीमराव इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन बोबडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप अहिरराव,पोलीस हवालदार संदीप शिंदे, पोलीस नाईक धर्मेंद्र जुवाटकर या पथकाकडून हा तपास करण्यात आला.