(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मनसुख हिरण यांच्या हत्येवेळी सचिन वाझे लोकलने गेले होते ठाण्याला; रेल्वे स्टेशनच्या CCTV मध्ये खुलासा
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे की, सचिन वाझे सीएसटी स्थानकाच्या दिशेने चालत जाताना दिसत आहेत. मनसुख हिरण हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान एनआयएच्या हाती लागलेला हा पुरावा अत्यंत महत्त्वाचा आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलेल्या काही गोष्टींमुळे मनसुख हिरण यांच्या हत्येवेळी सचिन वाझेही ठाण्यामध्येच उपस्थित होते आणि त्यांनी तपास यंत्रणांना भरकटवण्यासाठी आपला मोबाईल सीआययूच्या कार्यालयातच ठेवला होता.
मुंबई : मनसुख हिरण हत्या प्रकरणात आता एक महत्त्वाचा खुलासा झाला असल्याची माहिती मिळत आहे. एबीपी न्यूजच्या हाती यासंदर्भातील एक महत्त्वाचं सीसीटीव्ही फुटेज लागलं आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सचिन वाझे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सच्या दिशेने चालत जाताना दिसत आहेत. एनआयएच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन वाझे यांनी ओळख पटू नये यासाठी 4 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजून 15 मिनिटांपासून ते 7 वाजून 30 मिनिटांच्या दरम्यान लोकल ट्रेनने प्रवास केला होता. ते लोकलमधून ठाण्याला गेले होते.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे की, सचिन वाझे सीएसटी स्थानकाच्या दिशेने चालत जाताना दिसत आहेत. मनसुख हिरण हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान एनआयएच्या हाती लागलेला हा पुरावा अत्यंत महत्त्वाचा आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलेल्या काही गोष्टींमुळे मनसुख हिरण यांच्या हत्येवेळी सचिन वाझेही ठाण्यामध्येच उपस्थित होते आणि त्यांनी तपास यंत्रणांना भरकटवण्यासाठी आपला मोबाईल सीआययूच्या कार्यालयातच ठेवला होता.
एनआयएच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना सीसीएसटी स्थानकावर सचिन वाझे यांचं सीसीटीव्ही फुटेज मिळालं आहे. त्याची क्वॉलिटी अत्यंत खराब आहे. त्यामुळे त्यांना अंदाज लावणं कठिण होत आहे की, ते सचिन वाझे आहेत की, दुसरं कोणी. त्यामुळे एनआयएने सचिन वाझे यांना त्याच प्लॅटफॉर्मवर पुन्हा चालायला लावलं, जेणेकरुन त्याच सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते पुन्हा कॅप्चर होतील. त्यानंतर आधीचं सीसीटीव्ही फुटेज आणि आताच मॅच करुन पाहणं शक्य होईल.
या संपूर्ण प्रक्रियेत एनआयएसोबत सीएफएसएलचे एक्सपर्टही उपस्थित होते. एनआयएला तपासा दरम्यान हाती लागलेल्या माहितीनुसार, 4 मार्च रोजी रात्री जेव्हा मनसुख हिरण यांची हत्या झाली होती. त्या दिवशी सचिन वाझे संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कमिश्नर ऑफिसमधून निघाले होते. त्यानंतर ते सीएसटी स्थानकावर पोहोचले होते. सचिन वाझे यांना माहित होतं की, जर ते गाडीतून गेले तर एखाद्या सीसीटीव्हीमध्ये कैद होणार. त्यामुळेच सचिन वाझे चालत कमिश्नर ऑफिसमधून बाहेर पडले आणि सीएसटी स्थानकावर पोहोचले. तिथून त्यांनी ठाण्याला जाण्यासाठी ट्रेन पकडली.
दरम्यान, सचिन वाझे यांनी एटीएसकडे आपला जबाब नोंदवताना सांगितलं होतं की, ते दिवसभर आपल्या ऑफिसमध्येच होते. एनआयएच्या सुत्रांनी सांगितलं की, 30 मार्च रोजी त्यांना माहिती मिळाली की, सचिन वाझे लोकल ट्रेन पकडून सीएसटीवरुन ठाण्याला पोहोचले होते. त्यानंतर एनआयएने सीएसटी स्टेशनला जाऊन सचिन वाझे चालत जातानाचं सीसीटीव्ही फुटेज शोधणं सुरु केलं.
एनआयएने सांगितलं की, सचिन वाझे यांनी 7 वाजून 15 मिनिटांपासून ते 7 वाजून 30 मिनिटांमध्ये सीएसटी स्टेशनवर दिसून आले होते. त्यानंतर ते ठाणे स्थानकावर जवळपास आठ वाजता पोहोचले. त्यानंतर सचिन वाझे यांनी रात्री 8 वाजून 31 मिनिटांनी तावडे म्हणून मनसुख हिरण यांना फोन करुन भेटण्यासाठी बोलावलं. एनआयएच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, आम्ही या गोष्टीचा तपास करत आहोत की, शेवटी कोण-कोण सचिन वाझे यांच्यासोबत घोडबंदर रोडवर गेलं होतं. जिथे मनसुख हिरण यांना भेटण्यासाठी बोलवण्यात आलं होतं? मनसुख हिरण यांच्या हत्येनंतर त्यांचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास सचिन वाझे यांनी सांगितलं होतं का? की, सचिन वाझे यांनी मनसुख हिरण यांना हत्या करणाऱ्यांच्या ताब्यात दिलं होतं?
एनआयएच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मनसुख हिरण यांची हत्या झाल्यानंतर सचिन वाझे पुन्हा ठाणे स्टेशनवर आले आणि ट्रेन पकडून जवळपास 10 वाजून 30 मिनिटांनी भायखळा स्टेशनवर पोहोचले. तसेच एनआयएला त्यांच्या तपासात हिदेखील माहिती मिळाली आहे की, भायखळा स्टेशनवर उतरल्यानंतर सचिन वाझे एका मोठ्या आणि नामांकीत व्यक्तीला जाऊन भेटले होते. ही मिटिंग संपल्यानंतर सचिन वाझे टिप्सी बारमध्ये छापा मारण्यासाठी पोहोचले होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :