(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Politics Shivsena : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राजन विचारेंनी पहिल्यांदाच स्पष्टच सांगितले, म्हटले...
Maharashtra Politics Shivsena : शिवसेनेचे ठाण्याचे खासदार राजन विचारे, आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
Maharashtra Politics Shivsena : महिभरापूर्वी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व बंड झाले. एकनाथ शिंदे यांचे होमग्राउंड असलेल्या ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले. शिवसेनेत झालेल्या या बंडानंतर शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे शिष्य असलेले आणि एकनाथ शिंदे यांचे सहकारी खासदार राजन विचारे यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. शिवसेनेत बंड झाल्यानंतर राजन विचारे हे उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी राहिले मात्र त्यांनी भाष्य करणे टाळले होते. आता पहिल्यांदाच त्यांनी भूमिका मांडली आहे. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या अनिता बिर्जे यांच्यासह इतर जुने पदाधिकारी उपस्थित होते.
आज खासदार राजन विचारे आणि आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्या नेतृत्वात ठाण्यातील शिवसैनिकांनी 'मातोश्री' येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर खासदार राजन विचारे यांनी एबीपी माझासोबत बोलताना सांगितले की, ठाण्याचा बालेकिल्ला हा शिवसेनेचाच असून तो आणखी मजबूत ठेवू हे सांगण्याकरता मातोश्रीवर आलो असल्याचे खासदार राजन विचारे यांनी सांगितले. शिवसेनेला पहिली सत्ता ठाणेकरांनी दिली. ठाणे आणि शिवसेनेचे नाते आहे. आम्ही ठाण्यातील शिवसैनिक आहोत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचे शिवसैनिक आहोत. आज मातोश्रीवर आलेले शिवसैनिक हे स्वत: हून आले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी मातोश्रीवर आले असल्याचे त्यांनी सांगितले
आम्हीही आनंद दिघे यांचे शिष्य
आम्हीदेखील धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य असल्याचे राजन विचारे यांनी सांगितले. वयाच्या 16 व्या वर्षापासून शिवसेनेत काम करत आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनात काम केले आहे. मागील 40 वर्षांपासून शिवसेनेसाठी काम केले असल्याचे राजन विचारे यांनी सांगितले. शिवसेनेने एका सामान्य माणसाला शाखाप्रमुख, नगरसेवक, महापौर, आमदार आणि खासदार केले. त्याची आठवण असून निष्ठा व्यक्त करत असल्याचे राजन विचारे यांनी सांगितले.
केदार दिघे यांचा एकनाथ शिंदे यांना सवाल
आनंद दिघे यांच्यासोबत घडलेल्या घटनांचा साक्षीदार आहे. योग्य वेळ आल्यानंतर बोलणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होत. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी एकनाथ शिंदे यांना उलट सवाल केला आहे. अशी कोणती गुपिते आहेत, जी एकनाथ शिंदे यांनी मागील 20-25 वर्षांपासून लपवली आहेत आणि त्यांना आठवण झाली असा प्रश्न त्यांनी केला.
ठाणे जिल्हा शिवसेनेसाठी का महत्त्वाचा?
शिवसेनेच्या स्थापनेनंतर ठाणे महापालिकेत शिवसेनेचा पहिला महापौर झाला होता. ठाण्यात शिवसेना वाढवण्यासाठी आनंद दिघे यांनी मोठे प्रयत्न केले होते. त्यांच्या नेतृत्वात शिवसेना आणखी बळकट झाली होती. शिवसेनेसाठी राजकीयदृष्ट्या ठाणे जिल्हा अतिशय महत्त्वाचा आहे.