Mumbai News : पायाने दिव्यांग पण मनाने ‘श्रीमंत माणूस’ मंत्रालयात दरमहिन्याला का येतो?
Mumbai News : भौतिक सुखापासून दूर असणारी, मनाने श्रीमंत असणारी माणसं खूप क्वचित आपल्याला या जगात दिसतात. अशात एका शरीराने दिव्यांग पण मनाने श्रीमंत असणाऱ्या माणसाविषयी आपण पाहणारा आहोत.
![Mumbai News : पायाने दिव्यांग पण मनाने ‘श्रीमंत माणूस’ मंत्रालयात दरमहिन्याला का येतो? Maharashtra Mumbai why does a handicapman come to the mumbai mantralay every month with Mumbai News : पायाने दिव्यांग पण मनाने ‘श्रीमंत माणूस’ मंत्रालयात दरमहिन्याला का येतो?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/31/522f5a5c3997947acc86816be314bb0b_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : आधुनिक युगात सामान्य माणसाची पैसे कमावण्यासाठी दमछाक होते . यश, पैसा, सत्ता यामागे धावणारी माणसं आपल्याला पावलोपावली दिसतात. त्यात अनेक जण सरकार दरबारी फक्त सरकारी सुखसुविधा मिळवण्यासाठी धडपड करताना दिसतात. पण या सगळ्या भौतिक सुखापासून दूर असणारी, मनाने श्रीमंत असणारी माणसं खूप क्वचित आपल्याला या जगात दिसतात. अशात एका शरीराने दिव्यांग पण मनाने श्रीमंत असणाऱ्या माणसाविषयी आपण पाहणारा आहोत .
एक वेगळे सकारात्मक चित्र
राज्याचा गाडा जिथून हाकला जातो त्या मंत्रालयात दररोज हजारो लोक अनेक कामांसाठी हजेरी लावत असतात. आपल्या समस्या आणि अडचणींवर उत्तर शोधण्यासाठी अथवा अडकलेली कामे पूर्ण करून घेण्यासाठी राज्यातील लाखो लोकांची हजेरी असते. मात्र त्यात एक दिव्यांग असलेला व्यक्ती मंत्रालयात दर महिन्याला येतो. तो मागण्यासाठी नाही तर शासनाला काहीतरी देण्यासाठी येतो. या मनाने सर्वात श्रीमंत असणाऱ्या माणसाची धडपड आम्ही मंत्रालयात पाहिली आणि त्या माणसाला आम्ही गाठलं तर एक वेगळच सकारात्मक चित्र आम्हाला पाहायला मिळालं.
कोण आहेत हेमंत मिश्रा?
मंत्रालयात फिरणारे हेमंत मिश्रा हे पायाने दिव्यांग आहेत. मात्र दरमहा ते मंत्रालयात आपल्या कामातून वेळ काढत येतात. अंधेरी इर्ला नाला येथे या दिव्यांग व्यक्तीचे टेलिफोन बूथ आहे. हेमंत अविवाहित असून ते आपल्या आई-वडिलांसोबत अंधेरी येथे राहतात. आपला उदरनिर्वाह ते शासनाने दिलेल्या बूथमार्फत चालवतात. दिव्यांग असलेल्या हेमंत मिश्राचे हिंदी माध्यमातून दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. मोबाईल फोनच्या या युगात टेलिफोन बूथचा वापर अत्यंत कमी झाला आहे. त्यामुळे हेमंत मिश्राला महिन्याकाठी केवळ साडेतीन ते चार हजार रुपये मिळवतात. या पैशांमध्ये कसातरी आपला चरितार्थ ते चालवितात. मात्र त्यातून काही का होईना पण थोडी मदत दर महिन्याला मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देतात
हेमंत मिश्रा हे एक आदर्श
जगात एकीकडे सर्व परिस्थिती चांगली असताना अनेक कारणे देत लोक आपण आपला उदरनिर्वाह कसा करावा याविषयी चिंतेत असल्याचे पाहायला मिळतात. तर काही दुर्बल घटकातील लोक शासनाच्या अनेक योजना घेऊन फक्त आपला उदरनिर्वाह करण्याच्या मागे धावताना पाहायला मिळतात. सरकार शासनाकडून अनेकांना अनेकदा अनेक सुख सुविधा मिळतात मात्र ते शासनाच्या खाल्लेल्या मिठाला जागलेत असे क्वचित पाहायला मिळतात. त्यात हेमंत मिश्रा हे एक आदर्श सर्वांसमोर ठेवतात.
हेमंत मिश्रा काय म्हणतात?
आपण जे कमवतो त्यातील दोन पैसे गरजू रुग्णांसाठी खर्च केले पाहिजेत. गरजूंना उपचार मिळावेत आणि त्यासाठी आपला हातभार लागावा म्हणून मी महिन्यातून दोन वेळा मुख्यमंत्री सहायता निधीला शंभर रुपये देणगी देत असतो. त्यासाठी मी स्वतः दोन वेळा अंधेरीहून मंत्रालयात येतो असे हेमंत मिश्रा सांगतात.
अनेकजण सामाजिक भानापासून दूर पण...
अनेक जण सरकार दरबारी काहीतरी योजना आपल्याला मिळाव्या व आपली कामं मार्गी लागावी यासाठी फेरफटका मारत असतात. यात लाखो कोटी रुपये कमावणारे लोकं अनेकदा सामाजिक भानापासून दूर असल्याचे चित्र आपल्याला दिसतं. त्यामध्ये दिव्यांग असतानाही दर महिन्याला सामाजिक जाणीव ठेवत मिश्रा थोडी का होईना मदत मुख्यमंत्री सहायता निधीला करतात हे चित्र फार सकारात्मक आहे.
अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारे
आपल्या स्वतःच्या अत्यंत अडचणीच्या परिस्थितीतही हेमंत मिश्रा स्वतः येऊन मुख्यमंत्री सहायता निधीला दर महिना देणगी देतात. मिश्रा यांचे हे कार्य हे मोठ मोठ्या धनिकांना आणि केवळ फायदा मिळवण्यासाठी सरकार दरबारी मंत्रालयात येणाऱ्या अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. त्यामुळे हेमंत मिश्रा यांच्यासारखे मनाने श्रीमंत असणारे माणसं क्वचित पाहायला मिळतात.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)