Maharashtra Monsoon Assembly Session : अधिवेशनाचे दोनच दिवस उरले; आज पाचव्या दिवशी संघर्ष तीव्र होणार! आतापर्यंत काय काय घडलं?
Maharashtra Monsoon Assembly Session : राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) 17 ऑगस्टपासून सुरु आहे. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे.
Maharashtra Monsoon Assembly Session : राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) 17 ऑगस्टपासून सुरु आहे. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. काल शेतकऱ्यांच्या मदतीसह वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. आता अधिवेशनाचे केवळ दोनच दिवस उरले आहेत. या दोन दिवसात सत्ताधारी कामकाज उरकून घेण्याच्या प्रयत्नात असेल तर विरोधक आपल्या मागण्यांवरुन आक्रमक होण्याची चिन्हं आहेत. 17 आणि 18 ऑगस्ट रोजी दोन दिवस कामकाज चालल्यानंतर सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्या होत्या. त्यानंतर काल चौथ्या दिवशी अधिवेशनात बरंच काही घडलं. आज पाचवा दिवस असून उद्या अधिवेशनाची सांगता होणार आहे. हे शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन आहे. आज अधिवेशनात राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, रस्त्यांची दुरावस्था, राज्यातील कायदा सुव्यवस्था यासह अन्य मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला कोंडीत पकडू शकतात.
काल चौथ्या दिवशी काय काय घडलं...
काल विधिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं एक वेगळंच रुप महाराष्ट्रानं पाहिलं. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उत्तर देत असताना विरोधकांना चांगलेच टोले हाणले. त्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी अजित पवार उभे राहिले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना चांगलंच सुनावलं. दुष्काळावरुन सुरु झालेली चर्चा सभागृहातून वॉकआऊटपर्यंत पोहोचली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या कामाचा पाढा वाचला. तर ओला दुष्काळ का जाहीर केला नाही म्हणून अजित पवारांनी सभात्याग केला.
भंडारा-गोंदिया बलात्कार प्रकरणाचे (Bhandara gang rape case) काल सभागृहात पडसाद उमटल्याचे पाहायला मिळालं. भंडाऱ्यातील सामूहिक बलात्काराची घटना ही अत्यंत लाजिरवाणी असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं. पीडितेसोबत घडलेल्या गुन्ह्याची फडणवीसांनी सभागृहात काल माहिती दिली. या घटनेबाबत बेजबाबदार पोलिसांचे निलंबन केलं असल्याची माहिती देखील फडणवीसांनी दिली आहे. या घटनेतील आरोपी सापडेपर्यंत चौकशी थांबणार नसल्याचेही फडणवीस म्हणाले.
महाविकास आघाडीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित होते.
तिसऱ्या दिवशी काय काय झालं
नगराध्यक्ष आणि सरपंचांची निवड ही थेट जनतेतून करावी अशी मागणी जनतेचीच होती, तो आमचा अजेंडा नसल्याचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. या दरम्यान महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायत औद्योगिक नगरी पंचायत विधेयक 2022 संमत करावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. ते विधेयक बहुमताने मंजूर केलं.
बेरोजगारांना प्रति महिना 5 हजार बेरोजगारी भत्ता सुरु करा, माजी मंत्री एकनाथ खडसे यांची मागणी
विधानसभेत विनायक मेटे यांच्या अपघातासंदर्भात देवेंद्र फडणवीसांचं निवेदन
किती नर आणि किती मादी डास सापडले?' आधी अजित पवार आता छगन भुजबळांकडून आरोग्यमंत्र्यांची फिरकी
मुख्यमंत्र्यांनी 'एकनाथ'च रहावे 'ऐकनाथ' होऊ नये; धनंजय मुंडेंची विधानसभेत फटकेबाजी
दुसऱ्या दिवशी काय काय घडलं...
हरिहरेश्वर येथे सापडलेल्या एके 47 प्रकरणात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलीस अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा, संपूर्ण माहिती घेऊन काही वेळात देवेंद्र फडणवीस सभागृहात निवेदन केलं
विरोधकांकडून 289 अंतर्गत सर्व कामकाज बाजूला ठेऊन भंडारा जिल्ह्यातील बलात्कार प्रकरणावर चर्चेची मागणी, विधानपरिषदेत गोंधळ
आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं. आरोग्याच्या सबंधित विरोधकांच्या प्रश्नावर उत्तर देताना सावंतांची चांगलीच दमछाक झाली. पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या संबंधित प्रश्नावर नेमकी माहिती आरोग्यमंत्री सभागृहाला देऊ शकले नाहीत. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. अखेरीस प्रश्न मागे ठेवावा लागला. त्यानंतर बीड येथील स्त्री भृण हत्या प्रश्नी उत्तर देताना बीड जिल्हा यासाठी प्रसिद्ध आहे असं वक्तव्य आमदार भारती लव्हेकर यांनी केलं, त्यानंतही विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला.
मुंबई गोवा महामार्गावरुन विधानसभेत गोंधळ, मुंबई-गोवा हायवेवर अडीच वर्षात काही काम झालं नाही का? असा प्रश्न भाजपनं सेनेच्या आमदारांना विचारला, त्यावर भास्कर जाधव यांनी गेल्या 12 वर्षात हे चंद्रकांतदादा, नितीन गडकरींचं अपयश आहे का असा प्रति सवाल केला
पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे निलंबित, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा, बीड जिल्ह्यातील अवैध धंद्यांच्या संदर्भात लक्षवेधी, फडणवीस म्हणाले, राज्यात ज्या ठिकाणी असं सुरु आहे त्या ठिकाणी कारवाई केली जाईल
पहिल्या दिवशी 25 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 17 तारखेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्रोपदी मुर्मू यांची देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्द्ल अभिनंदन केलं. तसेच जगदीप धनखड यांचंही उपराष्ट्रपती निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींचं अभिनंदन केलं. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 25 हजार 826 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने प्रति हेक्टरी 13 हजार 600 रुपये मदत देणार असल्याची घोषणा केली होती.
25 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Session) 17 ते 25 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील बंडामुळं महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. शिंदे-फडणवीस सरकारचं हे पहिलंच अधिवेशन आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Ajit Pawar : अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, सरकारनं लवकरात लवकर भरीव मदत करावी : अजित पवार