उपमुख्यमंत्री दोन, पुजेचा मानकरी कोण? कार्तिकी एकादशीच्या महापुजेचं विठ्ठलाला कोडं, विधी व न्याय विभाग ठरवणार नाव
पंढरीतील विठ्ठल मंदिर समितीच्या आज झालेल्या बैठकीत कार्तिकी एकादशीच्या या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.

सोलापूर : आषाढी-कार्तिकी भक्तगण येती म्हणत पंढरीलाही (Pandharpur) भाविकांची ओढ लागलेली असते, आषाढी झाल्यानंतर आता कार्तिकी एकादशीची तयारी सुरू आहे. मात्र, यंदाच्या कार्तिकी एकादशीला दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणते उपमुख्यमंत्री पंढरीच्या पांडुरंगाची पूजा करणार, ह्या प्रश्नाचं कोडं विठ्ठलाला म्हणजेच मंदिर समितीला पडलं आहे. आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची परंपरा विठ्ठल मंदिरात आहे. मात्र, राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्याने कार्तिकीची पूजा शिवसेनेचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) का राष्ट्रवादीचे अजित पवार? (Ajit Pawar) यापैकी कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करायची याची विचारणा आता मंदिर समिती विधी व न्याय विभागाकडे करणार आहे.
पंढरीतील विठ्ठल मंदिर समितीच्या आज झालेल्या बैठकीत कार्तिकी एकादशीच्या या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. त्यानुसार, कार्तिकीची पूजा शिवसेनेचे एकनाथ शिंदे का राष्ट्रवादीचे अजित पवार? यापैकी कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करायची याची विचारणा आता विधी व न्याय विभागाकडे मंदिर समितीकडून करण्यात येणार असल्याचे ठरले आहे. त्यामुळे, उपमुख्यमंत्री दोन, पण पुजेचा मानकरी कोण? अशी चर्चा पंढरीत होत आहे. यंदा कार्तिकी एकादशी 2 नोव्हेंबर रोजी होत असून यावर्षी कार्तिकीच्या पूजेचा मान कोणाला मिळणार हे औत्सुक्याचे असणार आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मंदिर समितीची बैठक झाली. त्यामध्ये आषाढी यात्रेप्रमाणेच कार्तिकी यात्रेलाही सर्व सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला. यंदा कार्तिकी सोहळ्यात 26 ऑक्टोंबरपासून भाविकांना 24 तास दर्शन व्यवस्था सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
भाविकांसाठी 24 तास दर्शन रांग (Pandharpur vithhal darshan)
आषाढी आणि कार्तिकी या दोन मोठ्या यात्रा कालावधीमध्ये विठ्ठलाचे 24 तास दर्शन व्यवस्था केली जात असते. मंदिर जतन व संवर्धन कामाबाबत विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याबाबतही आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. प्रस्तावित पंढरपूर विकास आराखड्यामध्ये मुखदर्शनरांग, प्रशासकीय कार्यालय, अन्नछत्र व इतर अनुषंगीक सोई सुविधा उपलब्ध करून देणेबाबत जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव देणे, कम्युनिटी रेडीओ केंद्र स्थापन करण्यासाठी 4 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देणेबाबत शासनास प्रस्ताव देणे, एमटीडीसी भक्तनिवासाचा करारनामा वाढवून घेणेबाबत शासनास प्रस्ताव देणे इत्यादी निर्णय घेण्यात आल्याचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. कार्तिकी यात्रा पूर्व नियोजनाबाबत मंदिर समितीची बैठक श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे संपन्न झाली. बैठकीस सदस्या शकुंतलाताई नडगिरे, डॉ.दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), ॲड. माधवी निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, ह.भ.प.शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत तसेच पुरातत्व विभागाचे डॉ.विलास वाहणे, कार्यकारी अभियंता श्रीनिवास गुजरे, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, जतन संवर्धन कामाचे ठेकेदार तसेच सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
























