'या' 5 लाख शासकीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळीची अनोखी भेट; 'उत्सव अग्रीम' देण्यास मुख्यमंत्र्यांकडून मान्यता
उत्सव अग्रीम म्हणून बिनव्याजी 12 हजार 500 एवढी रक्कम दिली जाणार असून 10 समान हप्त्यात परतफेडीची सोयही करण्यात आली आहे.
Maharashtra Govt : राज्य शासनातील अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम देण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांनी मान्यता दिली. यामुळे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणेच गट क व गट ब या अराजपत्रित संवर्गातील कर्मचाऱ्यांना देखील उत्सव अग्रीम मिळणार आहे. उत्सव अग्रीम म्हणून बिनव्याजी 12 हजार 500 एवढी रक्कम दिली जाणार असून 10 समान हप्त्यात परतफेडीची सोयही करण्यात आली आहे.
यापूर्वी 2018 साली हा उत्सव अग्रीम मिळाला होता. अग्रीम घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ५ लाख इतकी आहे. दिवाळीच्या काळात या अग्रीमाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याकडे होतो. परिणामत: अप्रत्यक्षरित्या शासनाला महसूल वाढ मिळते.
केडीएमसीच्या कामगारांना 16 हजार 500 रुपये दिवाळीचा बोनस
कल्याण डोंबिवली महापालिका कामगारांना 16 हजार 500 रुपये बोनस जाहीर करण्यात आल्याची घोषणा महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली आहे. म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाळ हरदास आणि पदाधिकारी रवी पाटील यांनी आयुक्तांची आज भेट घेतली. कामगारांना 25 हजार रुपये बोसन दिला जावा अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. मागच्या वर्षी 15 हजार 500 रुपये बोनस दिला गेला होता. यंदा त्यात एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यंदा 16 हजार 500 रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे. बोनसची रक्कम येत्या बुधवारपर्यंत कामगारांच्या खात्यात जमा होईल असे आयुक्तांनी सांगितले. रेग्यूलर, ठोकपगारी, कंत्राटी, परिवहन आणि शिक्षण खात्यातील कामगारांना हा बोनस दिला जाणार आहे. केवळ वर्ग एक आणि दोनच्या अधिकाऱ्यांना बोनस दिला जाणार नाही हे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. बोनस जाहीर होताच कामगारांनी आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांना पेढे भरवले. त्यानंतर एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला.
ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी 18 हजार रुपयांचा बोनस
ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी 18 हजार रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांना देखील बोनस देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री, माजी महापौर नरेश म्हस्के, आयुक्त आणि प्रशासक अभिजीत बांगर यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय झाला. पालिका कर्मचारी आणि परिवहन मिळून जवळपास 9 हजार कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.