(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आज मंत्रिमंडळाची बैठक, शाळा, ओबीसी आरक्षण, एसटी आंदोलनासंदर्भात निर्णयाची शक्यता
Maharashtra Govt Cabinet Meeting : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Maharashtra Govt Cabinet Meeting) दुपारी होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे.
Maharashtra Govt Cabinet Meeting : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Maharashtra Govt Cabinet Meeting) दुपारी होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे. आजच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्यक्ष उपस्थित राहणार का? याकडे देखील लक्ष लागले आहे. दरम्यान आजच्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय होऊ शकतात.
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार होऊ शकतो. शाळा सुरु करण्याबाबत आजच्या बैठकीत महत्वाचा निर्णय होऊ शकतो. ओमायक्रॉनचे काही रुग्ण राज्यात देखील सापडले आहेत. कोरोनाची आकडेवारी जरी आटोक्यात असली तरी ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्याचा निर्णय तुर्तास स्थगित केला जाऊ शकतो. यासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं होतं की, स्थानिक पातळीवर निरीक्षण करुन शाळांबाबत निर्णय घेतला जाईल. मुंबई, पुण्यात 15 डिसेंबर पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ओमाक्रॉनच्या पार्श्वभूमीवर याठिकाणच्या प्रशासनाकडून परिस्थितीचं निरीक्षण केलं जात आहे. टास्क फोर्ससोबत चर्चा करुन शाळांची नियमावली बनवली आहे. इथुन पुढेही स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडून परिस्थितीचा आढावा घेऊन गरज पडल्यास पुढील निर्णय घेतले जातील, असं गायकवाड यांनी म्हटलं होतं.
एसटी आंदोलनाला एक महिना पूर्ण
एसटी आंदोलनाला एक महिना आज पूर्ण होतोय. राज्यातील काही भागातील एसटी सुरक्षा पुरवून सुरु होत असली तरी अद्यापही अनेक कर्मचारी संपावर ठाम आहेत. एसटी कर्मचारी शासनात विलिनीकरणाची मागणी घेऊन चांगलेच आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात देखील आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन निर्णय होऊ शकतो.
ओबीसी आरक्षणाला दिलेल्या स्थगितीवर चर्चा
सोबतच सुप्रीम कोर्टानं स्थानि स्वराज्य संस्थामधील ओबीसी आरक्षणाला दिलेल्या स्थगितीवर देखील आज चर्चा होऊ शकते. ओबीसी आरक्षणाला दिलेल्या स्थगितीमुळं राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर पुढील पावलं उचलण्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा होऊ शकते.
हंगामाच्या पार्श्वभूमीवर खतांच्या वाढत्या किमती तसेच महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या वाढत्या ईडी चौकशा यावर देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.