कोस्टल रोड वाढवण बंदरापर्यंत नेण्याचा सरकारचा विचार; विमानतळही बांधणार, एकनाथ शिंदेंनी मागवला अहवाल
Vadhavan Port CM Eknath Shinde: वाढवण बंदरासाठी रस्ता तसेच रेल्वेसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
Vadhavan Port CM Eknath Shinde मुंबई: पालघर तालुक्यातील डहाणूमधील वाढवण बंदर (Vadhavan Port) उभारण्यासाठी शासनाने जय्यत तयारी सुरु केली आहे. वाढवण बंदरासाठी रस्ता तसेच रेल्वेसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर येत आहे. मुंबईतील कोस्टल रोड (Coastal Road) वाढवण बंदरापर्यंत नेण्याचा सरकारचा मानस असल्याचं सांगण्यात येत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कोस्टल रोडला (Coastal Road) आगामी वाढवण बंदराशी (Vadhavan Port) जोडण्यासंदर्भात अहवाल मागवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच पालघरमध्ये विमानतळ बांधण्याबाबत जमिन आणि (Feasibility Report) साध्यता अहवाल एकनाथ शिंदेंकडून मागवण्यात आली आहे. वाढवण बंदर, विमानतळ आणि कोस्टल रोडशी जोडल्यास तिथे कनेक्टिविटी वाढून त्या भागाचा विकासही मोठ्या प्रमाणात होण्यास मदत होणार आहे.
वाढवण बंदर प्रकल्प नेमका काय?
सध्या महाराष्ट्रात दोन प्रमुख बंदरं आहेत. यातील एक मुंबई बंदर आणि दुसरं जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट बंदर. मात्र जेएनपीटीएने मुंबई शहराचा विकास आणि काही भौगोलिक कारणांमुळे या बंदरात अधिकची वाहतूक करणं शक्य नाही. तसेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टची कंटेनर हाताळण्याची क्षमताही संपत चालली आहे, असे सांगितले आहे. तसेच देशातील निर्यात व आयात क्षेत्रात होणारी वाढ पाहता भविष्यात दुसऱ्या बंदराची गरज लागू शकते. त्यामुळेच पालघर जिल्ह्यातील वाढवण परिसरात एक नवीन बंदर उभारण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य सागरी मंडळ आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या दोन संस्था एकत्र काम करत आहे.
वाढवण बंदराची जागतिक स्तरावर चर्चा-
कोट्यवधी प्रकल्पांच्या माध्यमांतून लाखो रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. या दृष्टीकोनातून महाराष्ट्रातील पालघरमध्ये उभारण्यात येणार असलेलं वाधवन बंदर अत्यंत महत्त्वाचं असल्याचं सांगितलं जात आहे. या बंदराची चर्चा सध्या जागतिक स्तरावर रंगल्याचं पाहायला मिळतंय. तसेच, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, हे बंदर पूर्ण होऊन सुरू झाल्यानंतर तब्बल 12 लाखांपर्यंतचे रोजगात निर्माण होणार आहेत. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील हे ग्रीन-फील्ड मेगा कंटेनर पोर्ट अंदाजे 10 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीने विकसित केलं जात आहे. तसेच, अनेक सोयी-सुविधांनी परिपूर्ण असलेलं हे बंदर जलवाहतुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे.