'देशाच्या शेतकऱ्यांबद्दल केंद्रातील सत्ताधाऱ्यांना कवडीची आस्था नाही', शरद पवारांचा आरोप
मुंबईच्या आझाद मैदानात आलेल्या मोर्चाला महाविकास आघाडीतील पक्षांनी पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या मोर्चात सहभाग झाले. यावेळी त्यांनी मोर्चाला संबोधित केलं. ते म्हणाले की, ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना देशातील कष्टकऱ्यांबद्दल व शेतकऱ्यांबद्दल कवडीची आस्था नाही
मुंबई : दिल्लीला सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हजारोच्या संख्येने महाराष्ट्रामधील शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले. या मोर्चाला महाविकास आघाडीतील पक्षांनी पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या मोर्चात सहभागी झाले. यावेळी त्यांनी मोर्चाला संबोधित केलं. ते म्हणाले की, ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना देशातील कष्टकऱ्यांबद्दल व शेतकऱ्यांबद्दल कवडीची आस्था नाही. 60 दिवस झाले उन्हातान्हात थंडी वाऱ्याचा विचार न करता शेतकरी आंदोलन करत आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी कधी त्यांची चौकशी केली का? असा सवाल अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ
पवार म्हणाले की, जो शेतकऱ्यांचे जीवन उध्वस्त करतो, त्याला समाजकारणातून उध्वस्त करण्याची ताकद आमच्या आहे, हे तुम्ही आज या ठिकाणी दाखवून दिलं आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांचा मी अभिनंदन करतो, असं शरद पवार म्हणाले. तुम्ही राज्यपालांना निवेदन द्यायला निघाला आहात. पण महाराष्ट्राच्या इतिहासात असले राज्यपाल लाभले नाहीत. राज्यपाल गोव्याला निघून गेलेत. राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे. पण माझ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही. राज्यपालांची ही नैतिक जबाबदारी होती. राज्यातला कष्टकरी, अन्नदाता त्यांना निवेदन देण्यासाठी येणार होता त्याला सामोरं येणं अपेक्षित होतं. पण त्यांच्याकडे सभ्यता नाही. निदान राजभवनात तरी बसायला हवं होतं, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले की, शेतकरी आंदोलक पंजाब व हरियाणाचे असल्याचं सरकारकडून सांगितलं जातं. पंजाबचा शेतकरी असला म्हणून काय झालं? पंजाब म्हणजे पाकिस्तान आहे का? असा सवाल देखील त्यांनी केला. चर्चा न करता कायदा आणले गेले. संसदेत जेव्हा कायदा आणला तेव्हा एका दिवसात एका अधिवेशनात एकदम तीन कायदे मान्य झाले. कायदा आणताना सविस्तर चर्चा झाली पाहिजे, असं देखील पवार म्हणाले.
मोर्चा अडवला, राज्यपालांना भेटण्यावर आंदोलक ठाम
आपल्या मागण्या घेऊन राजभवनाकडे निघालेल्या शेतकऱ्यांना मुंबईत मेट्रो सिनेमा चौकात अडवलं आहे. राज्यपालांना भेटण्यासाठी शेतकरी आंदोलक आणि काँग्रेस नेते आक्रमक झालेले पाहायला मिळालं. राज्यपालांशी भेट झाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही, असं अजित नवले यांनी सांगितलं आहे. दरम्यान शिष्टमंडळाला पोलिसांच्या गाडीत बसवून घेऊन जात असल्याचं देखील समोर आलं आहे. या शिष्टमंडळात सचिन सावंत, भाई जगताप, चरणसिंह सप्रा, मेधा पाटकर, अशोक ढवळे यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.
मोर्चा अडवल्यानंतर आक्रमक झालेल्या अजित नवले यांनी सांगितलं की, राज्यपाल पळून गेले. आम्हाला अडवलं गेलं. पोलिस ही देखील शेतकऱ्यांची पोरं आहेत. त्यांनाच आमच्या विरोधात उभं केलं आहे. शेतकऱ्यांचा अवमान राज्यपालांनी केला आहे. आमच्याच भावांना आमच्या विरोधात उभं केलं आहे, असा आरोप अजित नवले यांनी केला आहे. आमचा लढा भाजपशी आणि त्यांच्या दलालांशी आहे. पोलिस आमचे भाऊ आहेत, आमचा त्यांच्याशी संघर्ष नाही. राज्यपाल येईपर्यंत आम्ही मेलो तरी इथून जाणार नाही, असं नवले यांनी सांगितलं.
काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप म्हणाले की, राज्यपाल पळून गेले. कंगणा रनौतला भेटायला गोव्याला जातात हे अत्यंत निषेधार्ह बाब आहे. आम्ही शिष्टमंडळ जाणार होतो. हे राज्यपाल आल्यापासून ही पहिली वेळ नाही. ते याआधीही पळून गेले होतो. राज्यपाल पळपूटे आहेत, असं ते म्हणाले.
आम्ही राजभवनावर जाऊन निवेदन देणार आहोत. राज्यपालांनी वेळ दिली होती. त्यांनी हा मोर्चा पाहून पळ काढला. आता राजभवनावर जाऊन आम्ही पुढं काय करायचं ते ठरवू असं भाई जगताप म्हणाले.
सिंघू बॉर्डरपाशी दिल्लीतील दडपशाहीला तोंड देत शेतकरी ठाण मांडून त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत. हे कृषी कायदे शेतकरी विरोधीच नाही, तर साऱ्या जनसमुदायाविरोधातील कायदे आहेत, असं अशोक ढवळे म्हणाले.