Maharashtra Farmers Protest LIVE UPDATES | भेंडीबाजारातील महिला शेतकरी कशा? , विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांची टीका
Farmers Protest LIVE UPDATES Azad Maidan | अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चाचं वादळ अखेर काल रात्री मुंबईत पोहोचलं आहे. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. आज 25 जानेवारीला दुपारी हा मोर्चा राजभवनावर मोर्चा धडकणार आहे.
LIVE
Background
मुंबई : अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चाचं वादळ काल रात्री अखेर मुंबईत पोहोचलं आहे. या मोर्चामध्ये ट्रॅक्टर, जीप इत्यादी वाहनांसह हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. आज, 25 जानेवारीला हा मोर्चा राजभवनावर धडकणार आहे. केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 60 दिवसांपासून दिल्लींच्या वेशींवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील शेतकरी मोठ्या संख्येने या महामोर्चात सहभागी झालेले आहेत.
या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आझाद मैदानात शेतकऱ्यांचे तीन दिवसांचे धरणे आंदोलन असणार आहे. हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले असून हे लाल वादळ नाशिक कसारा घाटामार्गे शहापूर तालुक्यातून मुंबईत दाखल झालं. या मोर्चासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यातून हजारो शेतकरी सहभागी होत असल्याची माहिती किसान सभेच्या वतीनं देण्यात आली आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर मुंबईतील आझाद मैदानात देखील पोलीस प्रशासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी मुंबई पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाच्या अनेक तुकड्या देखील मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाल्या आहेत.
उद्या राजभवनावर धडक
अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चावर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून ड्रोन कॅमेरा यांचा देखील वापर करण्यात आला आहे. मुंबईत आझाद मैदानात मोर्चा दाखल झाल्यानंतर आज सकाळी 11 वाजता मुंबईतील आझाद मैदानात भाजप सोडून इतर सर्व पक्षातील नेते एकत्र येणार असल्याची शक्यता आहे. यावेळी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यात येणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. सकाळी 11 वाजता केंद्र सरकारच्या या धोरणाला विरोध केल्यानंतर हा मोर्चा राजभवनाच्या दिशेनं कूच करणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार कृषी कायद्याविरोधातील आंदोलनात सहभागी होणार
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मुंबईच्या आझाद मैदानावर शेतकरी आंदोलनास पाठिंबा देणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्यमंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीनं काही शेतकरी संघटनांनी घेतलेल्या निदर्शनास पाठिंबा दर्शविला जाईल. नवाब मलिक पुढे म्हणाले की, शेतकर्यांच्या वतीने नवीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ राजभवनाकडे मोर्चा काढण्यात येईल. यापूर्वीचं शरद पवार यांनी शेतीशी संबंधित या कायद्यांना विरोध दर्शविला होता. केंद्र सरकारने हे कायदे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली होती.
मुंबईत शनिवारी रात्रीपासून मोठ्या प्रमाणात पोलिसांची नाकाबंदी
मुंबईत राज्याच्या विविध भागातून शेतकऱ्यांचा मोर्चा दाखल झाला. त्यातच प्रजासत्ताक दिनही दोन दिवसांवर आहे. यामुळे मुंबईत घातपाताची ही शक्यता असल्यानं मुंबई पोलीस अलर्टवर आहेत. परवा रात्रीपासूनच यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर मोठी नाकाबंदी करण्यात आली आहे. सशस्त्र पोलिसांसह, रिफ्लेकटर, एलईडी लाईट आणि अत्याधुनिक बेरिकेटिंगसह मुंबईच्या घाटकोपर अंधेरी लिंक रोड, एलबीएस मार्ग, घाटकोपर मानखुर्द लिंक रोड, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग आणि मुंबईच्या सर्वच वेशींवर मोठ्या प्रमाणत बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबईत प्रवेश करणारे प्रत्येक वाहन तपासले जात आहे.