Maharashtra Coronavirus : राज्यात मास्क सक्ती? मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राजेश टोपे यांचे महत्त्वाचे वक्तव्य
Maharashtra Coronavirus Updates : राज्यात मास्क वापराची सक्ती न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
Maharashtra Coronavirus Updates : राज्यासह देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळात कोरोना परिस्थितीबाबत चर्चा झाली. राज्यात पुन्हा मास्क वापराच्या सक्तीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. राज्यात मास्क वापराच्या सक्तीचा निर्णय झाला नसल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत कोरोना महासाथीवर ही चर्चा करण्यात आली. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, सरकार परिस्थितीवर संपूर्ण लक्ष ठेवून आहे. तूर्तास मास्क वापराची सक्ती करण्यात आली नाही. मास्कचा वापर न केल्यास दंडही ठोठावण्यात येणार नाही. मात्र, नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करावा असे आवाहन राजेश टोपे यांनी केले.
राज्यातल्या वाढत्या कोरोना रुग्णांसदर्भात बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मास्कच्या विषयावर चर्चा झाली. नागरिकांमध्ये मास्क लावण्यासंदर्भात जनजागृती करावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर राज्य सरकारनं महाराष्ट्र मास्कमुक्तीची घोषणा केली होती. मास्कचा वापर ऐच्छिक करण्यात आला. मात्र कोरोनाची वाढती संख्या पाहता कोविड टास्क फोर्सनं चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सभागृहे, मॉल्स अशा गर्दीच्या बंदिस्त ठिकाणी मास्क वापराची सक्ती लागू करण्याचा सल्ला दिला आहे. या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली.
कोरोनाला घाबरुन जाऊ नका; टास्क फोर्सचे आवाहन
आपल्याला कोरोना व्हायरस सोबत जगावं लागेल, आपलं दैनंदिनी काम करावं लागेल, त्यामुळे कुठेही घाबरून जायचं किंवा किंवा पॅनिक व्हायचं कारण नाही असं मत राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी व्यक्त केलं आहे. बंदिस्त ठिकाणी जात असाल तर मास्क घालाच असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
इतर संबंधित बातम्या: