Gangster Suresh Pujari : गँगस्टर सुरेश पुजारी प्रकरणाचा तपास करणार एसआयटी, महाराष्ट्र एटीएसचा निर्णय
एटीएसने स्थापन केलेल्या एसआयटीमध्ये सात अधिकाऱ्यांचा समावेश आहे. एसआयटीच्या प्रभारीपदी एसपी दर्जा असणारे राजकुमार शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई : गेल्या तीन वर्षांपासून गुंगारा देणारा आणि रेडकॉर्नर नोटीस जारी झालेल्या गँगस्टर सुरेश पुजारीला (Gangster Suresh Pujari ) भारतात आणण्यात गुन्हे अन्वेशन विभागाला यश आले. सध्या त्याचा ताबा महाराष्ट्र एटीएस (Maharashtra ATS) कडे देण्यात आला असून त्याचा तपास करण्यासाठी महाराष्ट्र एटीएसने एसआयटी स्थापन केली आहे.
एटीएसने स्थापन केलेल्या एसआयटीमध्ये सात अधिकाऱ्यांचा समावेश आहे. एसआयटीच्या प्रभारीपदी एसपी दर्जा असणारे राजकुमार शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर एसआयटीमध्ये पोलीस निरीक्षक अविनाश कवटेकर, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश अवघडे, सहायक पोलीस निरीक्षक अमित शेलार, राजन शिंदे, अमित तेतंबे, सुर्यकुमार पाटील यांचा समावेश आहे.
गंभीर स्वरूपाचे तब्बल 24 गुन्हे दाखल असलेला गँगस्टर सुरेश पुजारी मुंबईतून पळून जाऊन दुबईत राहत होता. सुरेश पुजारीला भारतात परत आणण्यासाठी गुन्हे अन्वेशन विभाग गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्न करत होती. त्यांचा हा प्रयत्न 14 डिसेंबला यशस्वी झाला.
कोण आहे सुरेश पुजारी?
सुरेश पुजारीचा जन्म 1975 ला मुंबईतील घाटकोपर परिसरात झाला होता. त्याचे कुटुंब मुळचे कर्नाटकचे आहे. त्याचे शिक्षण सहावी पर्यंत झाले आहे. पुजारी सुरूवातील इलेक्ट्रिक कामे करत होता. परंतु, नंतर तो बेटिंग करू लागला. त्यावेळी त्याच्या विरोधात 1993 मध्ये ठाणे येथे हाफ मर्डरचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर 2002 ला त्याच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला.
2005 ला त्याची भेट ठाण्याच्या तुरूंगात रवी पुजारीच्या भावासोबत झाली. सुरेश पुजारीचा सहभाग 2006 मध्ये महेश भट फायरिंगमध्ये होता. पोलीस सुरेश पुजारीला पकडण्यासाठी प्लॅटिनम शॉपिंग मॉलमध्ये गेले होते. त्यावेळी त्याने पोलिसांवर फायरिंग केली होती.
सुरेश पुजारीने 2007 ला भारत सोडला होता. रवी पुजारीने आपल्या जबाबात गुन्हे शाखेला सांगितले होते की, 2008 ला सुरेश पुजारीने आपल्याला दुबईला बोलविले होते व तेथून गँग चालविण्याबाबत बोलणे झाले होते.
सुरेश पुजारीविरोधात तब्बल 24 गुन्हे दाखल आहेत. त्यातील 6 गुन्हे हे मोक्कांतर्गत दाखल करण्यात आले आहेत. सुरेश पुजारी 2006 पासून 2011 पर्यंत रवी पुजारीसोबत काम करत होता. त्यानंतर त्याने स्वत:ची एक गँग बनवली. त्यानंतर तो स्वत:ला वाचविण्यासाठी कधी दुबई तर कधी फिलिपीन्समध्ये लपून राहू लागला.
2013 मध्ये तो गुजरातला आला होता. त्याच्या मुलाचा रक्ताच्या कर्करोगाने मृत्यू झाला होता. त्यावेळी त्याने भारतीय तपास संस्थांपासून वाचण्यासाठी बनावट पासपोर्ट बनवला होता. त्यावर सतीश शेखर पई असे नाव लिहिले होते. त्यामुळे तो परत दुसऱ्यांदा दुबईला जावू शकला. त्यावेळीपासून मुंबई पोलीस त्याच्या शोधात होते.
2019 मध्ये सुरेश पुजारीच्या पासपोर्टची मुदत संपल्यानंतर भारतीय तपास यंत्रणांनी फिलिपीन्स पोलिसांसोबत संपर्क करून त्याच्या पासपोर्टचे नुतनीकरण होवू नये याची मागणी केली होती. नंतर पोलिसांना माहिती मिळाली की, तो एका महिलेसोबत राहत आहे. ही महिला लॉकडाऊनच्या आधी भारतात आली होती. ही महिला भारतात वेश्याव्यवसाय करत होती. त्यानंतर पोलिसांनी महिलेकडे विचारपूस केल्यानंतर सुरेश पुजारी फिलिपीन्सच्या मनीला भागातील एका इमारतीत राहत होता. पुजारी विरोधात 2016 ला रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या
- Gangster Suresh Pujari : ...अखेर गँगस्टर सुरेश पुजारी महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात, दुबईत राहून चालवायचा गँग
- Ola Scooter : ओला स्कूटर डिलिव्हरीसाठी सज्ज! जाणून घ्या किंमत आणि मायलेज!