रस्ते रुंदिकरणासाठी BMCनं काय पावलं उचलली? बिग बींच्या प्रतीक्षा बंगल्याच्या 'दीवार'वरुन लोकायुक्तांचा सवाल
Big B Amitabh Bacchan : रस्ते रुंदीकरणासाठी अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याची भिंत मोठी अडसर ठरत आहे. आता यावरुन लोकायुक्तांनी अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले आहेत.
Big B Amitabh Bacchan : महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या मुंबईत असलेला जुहू चौपाटी परिसरामधील प्रतीक्षा बंगल्याच्या (Pratiksha Bungalow) भिंत गेल्या बऱ्याच काळापासून चर्चेचा विषय ठरत आहे. आता पुन्हा एकदा ही भिंत चर्चेत आली आहे ती, लोकायुक्तांनी रस्ते रुंदीकरणाच्या मुद्द्यावरुन मुंबई महापालिकेला विचारलेल्या प्रश्नामुळं. अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याची भिंत रस्ते रुंदीकरणासाठी अडसर ठरत आहे, रस्ते रुंदीकरणासाठी 2019 मध्ये महापालिकेने प्रतिक्षा बंगल्याला लागून असलेल्या इमारतीची भिंत पाडली होती. पण अमिताभ यांच्या बंगल्यावर अद्याप काहीही कारवाई करण्यात आली नाही, याबाबत काँग्रेसनं लोकायुक्तांकडे धाव घेत तक्रार केली होती.
रस्ते रुंदीकरणासाठी अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याची भिंत मोठी अडसर ठरत आहे. मुंबई महापालिकेनं रस्ते रुंदीकरणासाठी कोणती पावलं उचलली, याचा चार आठवड्यात अहवाल सादर करावा, असे आदेश लोकायुक्तांनी दिले आहेत. रस्त्यासाठी अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याच्या भिंतीचा काही भाग तोडणं गरजेचं असल्याचा अहवाल सिटी सर्व्हे अधिकाऱ्यांनी जुलै महिन्यात दिला होता. तरी देखील मुंबई महापालिकेनं कोणतीच कारवाई केली नसल्यानं काँग्रेसनं लोकायुक्तांकडे धाव घेत तक्रार केली होती. आता मुंबई महापालिका लोकायुक्तांना अहवाल सादर करताना कोणती सबब देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांच्या अर्जावर लोकायुक्तांची सुनावणी पार पडली. पालिकेनं अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्षा बंगल्याच्या भिंतीसंदर्भात काय अॅक्शन घेतलीय याची माहिती लोकायुक्तांनी मागवली आहे. 2017 पासून अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याला नोटीस देण्यात आली आहे. रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये प्रतिक्षा बंगल्याची भिंत येत असल्यानं, ही भिंत हटवण्याबाबतची ही नोटीस आहे. मात्र, 2017 पासून प्रतिक्षा बंगल्यासंदर्भात पालिकेनं कोणतीही कारवाई केली नाही. पालिकेनं दिलेल्या नोटीसनुसार, कारवाई करत नाही, याबाबत नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी लोकायुर्कांकडे अर्ज केला होता.
मुंबईतील जुहू इथल्या संत ज्ञानेश्वर मार्ग रस्त्याच्या रुंदीकरणासाठी 2017मध्ये मुंबई महानगरपालिकाने आजू बाजूच्या सर्व इमारती आणि बंगल्यांच्या मालकांना त्यांच्या भूखंडाचा काही भाग देण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली होती. बहुतांश भूखंड मालकांनी प्रतिसाद दिला. मात्र अमिताभ बच्चन यांनी यावर कोणतही उत्तर मुंबई महानगरपालिकेला दिले नाही. दरम्यान 2019 मध्ये महापालिकेने प्रतिक्षा बंगल्याला लागून असलेल्या इमारतीची भिंत पाडली गेली. पण अमिताभ यांच्या बंगल्यावर अद्याप काहीही कारवाई करण्यात आली नाही.
प्रतिक्षा बंगल्याच्या बाजूला असलेल्या इमारतींवर रस्ता रुंदीकरणाच्या नावाने मुंबई महानगरपालिकेने भिंती तोडण्याची कारवाई केली होती. मात्र त्यानंतर त्या इमारतींमधील लोकांनी कोर्टामध्ये धाव घेतली होती. त्यांनी म्हटलं होतं की, आमच्या इमारती बाहेर असलेल्या भिंतीवर तोडक कारवाई झाली. मात्र शेजारच्या अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यांच्या भिंतींवर मात्र ते सेलिब्रिटी आणि व्हीआयपी असल्यामुळे कारवाई नाही झाली.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा