Lok Sabha Election Mumbai : मुंबईतील लोकसभेच्या सहापैकी तीन जागांवर आम्ही आग्रही, काँग्रेसच्या दाव्याने ठाकरे गटाची धाकधूक वाढणार
Mumbai Congress Lok Sabha Election : मुंबईतील 6 पैकी 4 लोकसभा जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी शिवसेना ठाकरे गटाकडून तयारी सुरू असताना काँग्रेसकडूनही दावे करण्यात येत आहे.
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आता सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. राज्यातही आधी महाविकास आघाडी, त्यानंतर 'इंडिया' आघाडीकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून राज्यातील लोकसभा जागांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. ठाकरे गटाने मुंबईतील सहापैकी चार जागांवर निवडणूक लढवण्यासाठीची तयारी केली असून काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीला (NCP) प्रत्येकी एक जागा देण्याचा प्रस्ताव मांडला असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, काँग्रेसने मुंबईत तीन जागांवर दावा केला आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी तीन जागांची भूमिका मांडली आहे. त्यामुळे आघाडीतील जागा वाटपाचा तिढा कसा सोडवणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
एबीपी माझासोबत बोलताना काँग्रेसचे माजी खासदार आणि नेते संजय निरुपम यांनी म्हटले की, मुंबईतील सहापैकी तीन लोकसभेच्या जागांवर काँग्रेस आग्रही राहणार आहे. उत्तर पश्चिम , दक्षिण मध्य आणि उत्तर मध्य मुंबई या तीन जागा काँग्रेससाठी महत्त्वाच्या आहेत. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी मी स्वतः उमेदवार म्हणून आग्रही असल्याचे निरुपम यांनी स्पष्ट केले.
निरुपम यांनी म्हटले यांनी म्हटले की, 2004, 2009, 2014 आणि 2019 पर्यंत मुंबईत लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती. त्यात काँग्रेस सहा पैकी पाच लोकसभेच्या जागेवर निवडणूक लढवत होतं. मुंबईत सहा पैकी कमीत कमी तीन जागेवर काँग्रेसकडून उमेदवार देण्याची तयारी असल्याचे त्यांनी म्हटले. या वेळेस आम्हाला पाच जागेची अपेक्षा नाही. या पाच जागेपेक्षा कमी जागेवर उमेदवार उतरवू पण किती कमी उतरायचं हे नेतृत्व ठरवणार असल्याचे निरुपम यांनी स्पष्ट केले.
आपण स्वतः उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही आहोत. तसं काम माझ्याकडून सुरू आहे हे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सुद्धा माहित असल्याचा दावा त्यांनी केला. काँग्रेस हा उत्तर पश्चिम, उत्तर मध्य आणि दक्षिण मध्य या तीन जागांसाठी आग्रही असेल असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. या तीन लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मानणारा मतदार आहे, या तीन जागा काँग्रेससाठी चांगल्या आहेत.
जागा वाटपात इंडिया आघाडीत काय करणार?
जागा वाटपात इंडिया आघाडीत अडचणी खूप येणार असल्याचेही निरुपम यांनी म्हटले. आघाडीत 26 पक्ष एकत्र आहेत. पण त्यावर आम्ही मात करू हा विश्वास आम्हाला आहे. लोकसभेच्या जागा वाटप संदर्भात शिवसेना ठाकरे गटाकडून जोपर्यंत अधिकृत स्टेटमेंट येत नाहीत तोपर्यंत काँग्रेसकडून कोणतही स्टेटमेंट दिले जाणार नाही, हे देखील संजय निरुपम यांनी म्हटले.
कोणाला कोणत्या जागांवर लढायचं आहे किंवा किती जागांवर लढायचं आहे याचा निर्णय शिवसेना ठाकरे गट किंवा काँग्रेस करणार नाही तर इंडिया आघाडीतील नेते निर्णय घेतील असेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्यात जागावाटपाच्या मुद्द्यावर जेव्हा समिती तयार होईल त्याच्यानंतर यावर निर्णय घेतला जाईल. दिल्लीतल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, प्रत्येक राज्यात जागा वाटपाबाबत एक समिती बनवली जाणार आहे आणि ती जागा वाटपा संदर्भात निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले.