Lok Sabha Election : नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस ते सुप्रिया सुळे ; लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी वर्ध्याला पसंती का?
Wardha Loksabha Election : वर्धा मतदारसंघात सध्या भाजपचा खासदार असून त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचे नाव चर्चेत आहे.
वर्धा: राज्याच्या राजकारणात एक लो प्रोफाइल लोकसभा मतदारसंघ (Wardha Loksabha) म्हणून ओळखला जाणारा वर्धा अचानकच हाय प्रोफाईल झाला आहे. कारण प्रत्येकालाच वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे असे सध्याचे चित्र आहे. कधी नितीन गडकरी (Nitin Gadkari) तर कधी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) वर्धा यातून लोकसभेला जातील अशी चर्चा होते. तर आता चंद्रशेखर बावनकुळे आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे नावही वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी चर्चेत आले आहे. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्यासारख्या दिग्गजांच्या विचारांचे केंद्र असलेला वर्धा सध्याच्या राजकारण्यांना का आकर्षित करत आहे याची चर्चा आहे
आतापर्यंत लो प्रोफाईल मतदारसंघ
वर्धा... महात्मा गांधींच्या अनेक वर्षांच्या वास्तव्यामुळे स्वातंत्र्यापूर्वी पासून देशाच्या राजकारणात एक महत्वाचं केंद्र ठरला आहे. त्याकाळी काँग्रेस पक्षाच्या महत्वाच्या बैठकांपासून स्वातंत्र्य लढ्यातील भारत छोडो सारखे महत्त्वाच्या आंदोलनांचे निर्णय वर्ध्यात झाले. अलीकडील काळात 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सेवाग्राम आश्रमात आले होते. तसेच वेळोवेळी सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे बापू कुटीला झालेले दौरे सोडले, तर वर्धा राष्ट्रीय आणि राज्याच्या राजकारणात तुलनेने लो प्रोफाईल असा मतदारसंघ राहिला आहे. मात्र, आता तोच लो प्रोफाईल वर्धा राजकारणात अचानक हाई प्रोफाईल झाला आहे.
नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचे नाव चर्चेत
या मतदारसंघातून अधून मधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वर्धातून लोकसभेची निवडणूक लढवतील अशी चर्चा होत असते. तर भाजप श्रेष्ठी देवेंद्र फडणवीस यांना केंद्राच्या राजकारणात घेऊन जातील अशी चर्चा जेव्हा उचल खाते, तेव्हा त्यांच्यासाठी हा वर्धा लोकसभा मतदारसंघच नाव चर्चेत राहतो.
आता तोच वर्धा लोकसभा मतदारसंघ नव्याने चर्चेत आहे. सुरुवात झाली भाजप मधील काही नेत्यांना लोकसभा निवडणूक लढवली जाईल या बातमीने. भाजपचे वर्तमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) वर्ध्यातून लोकसभेची निवडणूक लढवतील अशी नवी चर्चा सुरू झाली. मात्र स्वतः बावनकुळे यांनी या सर्व चर्चांचे खंडन करत असा कोणताही निर्णय अद्याप झालेला नसल्याचे सांगितले.
बावनकुळे यांचे स्पष्टीकरण येऊन काही तास उलटले होते तोच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 'होय, मला ही वर्ध्यातून निवडणूक लढवायला आवडेल कारण, वर्ध्यातून महात्मा गांधींच्या विचारांची ऊर्जा मिळते' असे वक्तव्य केले. विशेष म्हणजे आधी कार्यकर्त्यांच्या बैठकीत आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत असे दोन वेळेला सुप्रिया सुळे यांनी वर्धाला पसंती दिली.
राजकारण्यांच्या या शाब्दिक वक्तव्यांच्या पलीकडे जाऊन वर्धा लोकसभा मतदारसंघ समजून घेणंही तितकच महत्वाचं आहे.
वर्धा लोकसभा मतदारसंघ
- 1952 पासून 1989 पर्यंत सलग 9 लोकसभा निवडणुका काँग्रेसने जिंकल्या.
- 1991 ला भारतीय कम्युनिस्ट पार्टी तर 1996 आणि 2004 मध्ये भाजपच्या विजयाचे तीन अपवाद वगळता 2014 पर्यंत वर्धा लोकसभा मतदारसंघावर प्रामुख्याने काँग्रेसचा गड राहिला आहे.
- 2014 आणि 2019 मोदी लाटेमध्ये दोन वेळेला भाजपने वर्धा लोकसभा मतदारसंघात मोठे विजय मिळविले आहे.
- त्यामुळे वर्धा लोकसभा मतदारसंघ काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षातील नेत्यांना आपलाच वाटतो.
सुप्रिया सुळे वर्ध्यातून लढण्यास उत्सुक
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी वर्धा मतदारसंघाला पसंती दिल्यानंतर विद्यमान भाजप खासदार अस्वस्थ झाले आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघ परंपरेने काँग्रेसचा मतदारसंघ आहे आणि वर्धा मतदारसंघ काँग्रेस राष्ट्रवादीसाठी सोडेल अशी शक्यता भाजपला दिसत नाही.
वर्धा लोकसभा मतदारसंघाची सध्याची स्थिती सुप्रिया सुळे किंवा काँग्रेस-राष्ट्रवादीला अनुकूल आहे का?
- सध्या वर्धा लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी 4 भाजपकडे, एक अपक्षकडे तर विधानसभेची फक्त एक जागा काँग्रेसकडे आहे.
- वर्ध्यात मोठ व्यवसायिक आणि सामाजिक कार्य असलेला मेघे कुटुंब सध्या भाजपसोबत आहे.
- 2014 आणि 2019 मधील लोकसभा निवडणुका भाजपने मोठ्या फरकाने जिंकल्या आहेत...
- वसंत साठे वगळता वर्ध्यात कधीही बाहेरच्या उमेदवाराला विजय मिळालेला नाही.
त्यामुळे महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारांचा केंद्र असल्याकारणाने जरी वर्धा लोकसभा मतदारसंघ सुप्रिया सुळे किंवा इतर दिग्गजांना आकर्षित करत असला तरी वैचारिक दृष्टिकोनातून अनुकूल असलेला मतदारसंघ निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तेवढाच अनुकूल ठरेल हे गृहीत धरणे राजकारणात धोक्याचे ठरेल.
ही बातमी वाचा: