जाऊ दे रे टँकर... 5 व्या दिवशी मुंबईतील टँकर चालकांचा 'संप मागे'; बैठकीत तोडगा निघाल्याने घोषणा
मुंबई वॉटर टँकर असोसिएशन आणि महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यात झालेली बैठक सकारात्मक झाली.

मुंबई : गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेला मुंबईतील (Mumbai) टँकर असोसिएशनचा संप अखेर आज मागे घेण्यात आला आहे. मुंबई टँकर असोसिएशनसोबत झालेल्या चर्चेनंतर शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. मुंबईतील पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर चालकांनी बुधवार मध्यरात्रीपासूनच संप पुकारला होता. त्यामुळे, मुंबईतील अनेक बांधकामे, ऑफिसेस, मॉल आणि इतर ठिकाणी या संपाचा फटका बसत होता, अनेक कामे ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी टँकर (Tanker) चालकांच्या शिष्टमंडळाची तातडीची बैठक बोलावली होती. मुंबई महानगरपालिकेने लागू केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यासह टँकर चालकांच्या चिघळलेला संपावर अखेर बैठकीत तोडगा निघाला आणि टँकर असोसिएशनने संप मागे घेतला.
मुंबई वॉटर टँकर असोसिएशन आणि महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यात झालेली बैठक सकारात्मक झाली. त्यामुळे आता वॉटर टँकर संपाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार, आमदार मुरजी पटेल यांनी पत्रकार परिषद घेत संप मागे घेतल्याची घोषणा केली. मुंबईत गेल्या 4 दिवसांपासून वॉटर टँकरचा संप सुरू होता. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल. मात्र, आजच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने अखेर संप मागे घेण्यात आला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे मी आभार मानतो. वॉटर टँकर असोसिएशन आणि आयुक्त यांच्यातील बैठकीमध्ये चर्चा झाल्यानुसार ते संप मागे घेत आहोत. भूषण गगरांनी यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे, तुमच्यावर कारवाई होणार नाही. त्यांनी टँकर असोसिएशनचे म्हणणे ऐकून घेतले. टँकर असोसिएशनला ज्या नोटीस दिल्या होत्या, त्या सर्व मागे घेण्यात येत आहेत. कोणत्याही प्रकारची कारवाई करणार नसल्याचे आश्वासन आयुक्त भूषण गजरांनी यांनी दिले. तसेच, आम्ही लवकरच मुंबई पोलीस आयुक्त यांची सुद्धा भेट घेणार. संपूर्ण महाराष्ट्र शासन हे टँकर असोसिएशनच्या मागे उभे राहणार आहे. म्हणून, आपल्या माध्यमातून आम्ही असोसिएशनला विनंती करण्यासाठी आलो आहे की तुम्ही संप मागे घ्यावा. जे जे पाण्यापासून वंचित आहेत त्यांच्यापर्यंत पाणी पोहोचवा अशी विनंती देखील मुरजी पटेल यांनी केली आहे.
संप मागे, टँकर पाठवले - राजेश ठाकूर
आम्ही आमचा संप मागे घेत आहोत, आम्ही मुंबईला वेठीस धरणार नाही. आम्ही ताबडतोब आमचे टँकर सगळ्या सोसायटींमध्ये पाठवले आहेत. पुन्हा आमच्यावर अशी कारवाई होऊ नये, यामुळे आम्ही आता कोर्टात जाऊन दाद मागणार आहोत, असे वॉटर टँकर असोसिएशनचे राजेश ठाकूर यांनी म्हटले.
टँकरचालकांचा संप कशासाठी?
केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नवीन नियमावली विरोधात मुंबईतील टँकर चालकांनी संप पुकारला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय जलशक्ती मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निर्देशानंतर मुंबई महानगरपालिकेने विहीर आणि कूपनलिका धारकांना बजावलेल्या नोटिसांना स्थगिती देण्यात आली. तरीही, टँकर चालक संप मागे घेत नसल्याने, व्यापक जनहित लक्षात घेता महानगरपालिका प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लागू केला होता. अखेर टँकर चालकांनी संप मागे घेतला आहे.
























