(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लालबागचा राजा मंडळाला महापालिकेकडून 3 लाखांचा दंड; 'या' कारणामुळं कारवाई
Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal : मुंबईच्या लालबागचा राजा गणेश मंडळाला बीएमसीने 3 लाख 66 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
BMC Imposed 3 Lakhs Fine of Lalbagh Raja Mandal : लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला (Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal) मुंबई महापालिकेकडून (Mumbai Mahanagar Palika) तब्बल तीन लाख 66 हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav 2022) कालावधीत रस्त्यांवर पाडलेल्या खड्ड्यांसाठी लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला दंड करण्यात आला आहे.
मुंबईच्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला मुंबई महानगरपालिकेनं (BMC) चांगलाच दणका दिला आहे. मनपानं 3 लाख 66 हजार रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे. मंडळानं गणेशोत्सवात मंडप बांधण्यासाठी फुटपाथवर 53 तर रस्त्यावर 150 खड्डे खोदले होते. त्यासाठी हा दंड आकारण्यात आल्याचं मुंबई महापालिकेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
गणेशोत्सवादरम्यान, मुंबईतील गणेशोत्सव मंडळ दरवर्षी मंडप बांधण्यासाठी मुंबई महापालिकेकडून परवानगी घेतात. त्यानंतरच मंडप बांधण्यासाठी परवानगी मिळते. अनेक मंडळ मंडप बांधण्यासाठी रस्त्यांवर खड्डे खणतात. तसेच, काही ठिकाणी फुटपाथवरील पेवरब्लॉक हटवून त्याठिकाणी खड्डे खणून मंडपाचे खांब रोवले जातात. गणेशोत्सवानंतर यासर्व गोष्टींचा आढावा महापालिकेकडून घेतला जातो. त्यानंतर ज्या-ज्या मंडळांनी रस्ते आणि फुटपाथची नासधूस केली आहे. त्या मंडळांना दंड आकारला जातो.
दरम्यान, मुंबईचा गणेशोत्सव म्हटलं की, प्रसिद्ध ठिकाण म्हणजे, लालबाग. लागबागमध्ये अनेक गणेशोत्सव मंडळ प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक म्हणजे, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्कर होण्यासाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात. त्यामुळे मंडळाकडून दरवर्षी मोठी व्यवस्था केली जाते. त्यासाठी मोठे मंडप उभारले जातात. त्यावेळी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळाकडून अनेक ठिकाणी खड्डे पाडले जातात. गणेशोत्सवानंतर नियमाप्रमाणे, महापालिकेकडून खड्डे बुजवण्याची जबाबदारी मंडळावर सोपवण्यात आली आहे. मात्र, गणेशोत्सवानंतर अनेक दिवस उलटून गेले तरिही लालबागचा राजा मंडळाकडून खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत. हे खड्डे वेळीच बुजवलेले नसल्यानं महापालिकेनं मंडळाला 3 लाख 66 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :