'हमीभाव घेतल्याशिवाय शांत बसणार नाही', मुंबईतील महापंचायतीमध्ये शेतकरी नेत्यांचा एल्गार
Kisan Mahapanchayat Mumbai :संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्यावतीनं आझाद मैदानात आयोजित महापंचायतीत शेतकरी नेत्यांनी हमीभाव घेतल्याशिवाय शांत बसणार नाही अशा भावना व्यक्त करत एल्गार केला.
Kisan Mahapanchayat Mumbai :संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्यावतीनं आझाद मैदानात आयोजित महापंचायतीत शेतकरी नेत्यांसह शेतकरी, शेतमजूरांनी हमीभाव घेतल्याशिवाय शांत बसणार नाही अशा भावना व्यक्त करत एल्गार केला. आझाद मैदानात मोठ्या संख्येने शेतकरी आणि शेत मजूर दाखल झाले आहेत. मोदी सरकारनं मागे घेतलेले शेतकरीविरोधी कायदे संसदेत मागे घेतल्यावरच आंदोलन मागे घेण्यात येईल असंही शेतकरी नेत्यांनी म्हटलं. सोबतच शेतमालाला किमान हमी भाव देण्यावर सर्वजण ठाम आहेत.
सरकारनं शेतकऱ्यांसोबत संवाद साधावा - राकेश टिकैत
शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले की, आताचे पंतप्रधान आणि तेव्हाचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात 2011 सालच्या समितीच्या शिफारशी सरकारनं लागू कराव्यात. हमीभाव कायदा सरकारनं देशात लागू करावा, सरकारनं शेतकऱ्यांसोबत संवाद साधावा, असं ते म्हणाले. शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखले जात आहे, असं ते म्हणाले.
हमीभाव घेतल्याशिवाय शांत बसणार नाही- मेधा पाटकर
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर म्हणाल्या की, हा आपला पहिला विजय आहे, अजून पुढे अजून संघर्ष आहे. 700 जण ह्यात शहीद झाले आहेत. मोदींनी घोषणा करताना देशाची माफी मागितली आहे. त्यांच्यासमोर निवडणुका आहेत, मात्र आमच्या संघर्षासमोर मोदींना झुकावं लागलं. टाळेबंदीत संसदेत 20 हून अधिक बिल पास झाली आहेत. ती सर्व कंपनीच्या हिताची आहेत. आजचे शेठजी अंबानी, टाटा, बिर्ला आहेत. देशातील हिंसेला पंतप्रधान जबाबदार आहेत, असंही मेधा पाटकर म्हणाल्या. पुढे मेधाताई म्हणाल्या की, हमीभाव घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. 7 डिसेंबरला संसदेत काय होतंय हे पाहून आम्ही पुढचा निर्णय घेऊ. समता आणि न्यायाची आमची लढाई आहे. रेल्वे, बीएसएनएल विकली जात आहे आणि म्हणतात आमच्याकडे पैसे नाहीत. शेतकऱ्यांना हमीभाव का नाही देऊ शकत. मोदींची वापसी सुरु झाली आहे. या शहरातील मोठ्या इमारती बनवणारे खाली पोट आहेत. मोदी अंतरारीष्ट्रीय स्तरावर पर्यावरणावर बद्दल बोलतात मात्र देशात काही करत नाहीत. मात्र आम्ही नर्मदा वाचवण्याचा प्रयत्न करतोय, सतलज वाचविण्याचा प्रयत्न करतोय, गंगा, जमूनासारख्या नद्यांची वाईट स्थिती आहे, असंही मेधा पाटकर म्हणाल्या.
शेतकऱ्यांना एमएसपी पाहिजे, यासाठी संघर्ष सुरु राहिल - योगेंद्र यादव
शेतकरी नेते योगेंद्र यादव म्हणाले की, देशाच्या शेतकऱ्यांना एका वर्षाचा संघर्ष केल्यानंतर ऐतिहासिक विजय मिळवला आहे, एक वर्ष संकल्प आणि संघर्ष शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी आत्मसन्मान मिळवला आहे, राजकीय महत्त्व त्यांना त्यांचे कळलं आहे. सोबतच शेतकऱ्यांची एकताही दिसली आहे. शेतकऱ्यांना एमएसपी पाहिजे, यासाठी संघर्ष सुरु राहिल, असं यादव म्हणाले. पंतप्रधानांनी कायदा मागे घेण्याची घोषणा केली त्यामुळे उद्याचा प्रस्तावित मोर्चा स्थगित केला आहे. आम्हाला सरकारकडून येणाऱ्या उत्तराची अपेक्षा आहे. तीन कायदे रद्द करून पिकाला हमीभाव मिळावा, असे आम्ही म्हटले होते. महाराष्ट्रातही एमएसपी नाही. हे आम्ही आज म्हणत नाही, पहिल्या दिवसापासून बोलत आहोत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. एमएसपीची मागणी ही तीच मागणी आहे जी 2011 मध्ये पंतप्रधानांनी स्वत: मुख्यमंत्री असताना केली होती. तुम्ही तुमचे तरी ऐका, असा टोला त्यांनी लगावला.
नरसय्या आडम यांची शरद पवारांवर टीका
नरसय्या आडम यांनी यावेळी खासदार शरद पवारांवर टीका केली. एसटीच्या संपावरुन कामगारांवर दडपशाही होत असल्याचा आरोप आडम यांनी केला. दडपशाही सुरुच राहिल्यास महाराष्ट्र बंद करावा लागेल. अनिल परब साहेब, आम्ही मोदीला वाकवलं तुम्हाला वाकवायला किती वेळ लागणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.