Kalyan Crime Update : अत्याचार अन् मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर बारमध्ये...; कल्याण हत्याप्रकरणी नराधमाचा व्हिडीओ आला समोर
Kalyan Crime Update: कल्याण अल्पवयीन मुली सोबत लैंगिक अत्याचार करून हत्या प्रकरणातील नराधम आरोपी विशाल गवळी याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
कल्याण : कल्याण पूर्वमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सोमवारी सायंकाळी पीडित मुलगी घरातून खाऊ आणण्यासाठी बाहेर गेली होती. त्यानंतर तिचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळी, त्याची बायको आणि रिक्षावाला या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणातील आरोपी गवळी हा कल्याण परिसरातील गुंड आहे. त्याच्यावर काही गुन्हे देखील दाखल आहेत. आरोपीवरती यापूर्वी पोक्सोसह विनयभंगाचे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. दरम्यान या प्रकरणातील आरोपीने पिडितेवर अत्याचार आणि हत्या केल्यानंतर आणि मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर एका बारमध्ये दारू घेतानाचे सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.
कल्याण परिसरातील अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार करून हत्या केलेल्या मुख्य आरोपीचे हे सीसीटीव्ही फुटेज आहे. मुलीचा मृतदेह टाकल्यानंतर आरोपी विशाल गवळी याने कल्याणमधील आधारवाडी परिसरातील एका बार मध्ये दारू घेतानाचे हे फुटेज आहेत. अल्पवयीन मुली सोबत केलेल्या कृत्याचा त्याच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप नसल्याचे दिसून येत आहे.संबधित घटना उघडकीस आल्यानंतर कल्याण परिसरात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर संतप्त नागरिकांनी आंदोलनाचाही इशारा दिला आहे. दरम्यान बदलापुरची घटना ताजी असतानाच आणि संतप्त नागरिकांनी केलेल्या आंदोलनाचा फटका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी कोळशेवाडी पोलीस ठाणे परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.
अक्षय शिंदेचा एनकाउंटर केला तसाच विशाल गवळीचाही करा
कल्याण पूर्वेत एका 13 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचा निषेध स्थानिक महिला आणि शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे, त्याचबरोबर कल्याण कोळसेवाडी पोलिसांना निवेदन देत बदलापूरमध्ये झालेल्या घटनेतील अक्षय शिंदे प्रमाणेच या विशाल गवळीला शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. विशाल गवळी हा विकृत नराधम कल्याण पूर्वेत दहशत माजवत असल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीची हत्या करून तिच्यावर अत्याचार केला या संतापजनक घटनेवर स्थानिक महिला यांनी बदलापूरच्या प्रकरणी अक्षय शिंदे याला गोळ्या घातल्या त्याच प्रमाणे याला देखील गोळ्या घालण्यात यावे अशी मागणी करत संताप व्यक्त केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी आईकडून 20 रुपये घेऊन खाऊ आणण्यासाठी घरातून बाहेर पडली. पण सायंकाळी उशिरा झाला तरी ती मुलगी घरी आली नाही, त्यानंतर मुलीच्या आईने शोधायला सुरु केली. मात्र, शोधाशोध करूनही मुलगी सापडत नाही, हे लक्षात आल्यानंतर महिलेने आपल्या पतीला मुलगी सापडत नसल्याचं सांगितलं. यानंतर मुलीचे घरी आले, दोघांनीही मुलीला शोधलं. पण मुलगी कुठेच सापडली नाही. यानंतर दाम्पत्यानं कोळशेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन मुलगी बेपत्ता झाल्याचं सांगितलं. मंगळवारी कल्याण-पडघा रस्त्यावरील निर्जनस्थळी एका झुडपामध्ये मुलीचा मृतदेह आढळला. हे ठिकाण मुलीच्या घरापासून 13 किलोमीटर दूर आहे. मुलीवर लैंगिक अत्याचार करून मग तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने पुन्हा एकदा संताप व्यक्त केला जात आहे.