कल्याणच्या आधारवाडी कारागृहात कोरोनाचा शिरकाव, 30 कैद्यांना कोरोनाची लागण
आधारवाडी कारागृहात रविवारी आरोग्य विभागाच्या मदतीने 350 कैद्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. यातील 30 कैद्यांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कल्याण : राज्यातील कोरोची स्थिती भीषण बनत चालली आहे. काल रविवारी आधारवाडी कारागृहात केलेल्या करोना तपासणीत 30 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या कैद्यांना उपचारासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संसर्ग वाढू नये यासाठी आधारवाडी कारागृहातील कैद्यांची व्यवस्था कारागृह समोरील डॉन बॉस्को शाळेत करण्यात आली आहे. काही कैद्यांमध्ये कोरोना सदृश्य लक्षणे दिसू लागल्याने या कैद्यांना कारागृहात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
आधारवाडी कारागृहात रविवारी आरोग्य विभागाच्या मदतीने 350 कैद्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. यातील 30 कैद्यांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व कैद्यांना उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आजपासून कारागृहात 45 वर्षांवरील कैद्यांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. कारागृहातील 1100 कैद्यांचे दरम्यान कोविड रुग्ण सापडल्यानंतर जेलमध्ये सॅनिटायजेशन करण्यात आले असून उर्वरित सर्व कैद्यांना पोषक आहार देण्यात येत आहे. तर एखाद्या कैद्याला थंडी-ताप आल्यास जेलमध्ये विलगीकरण कक्षही बनवण्यात आला आहे. कोरोनाची लक्षणे असणाऱ्या कैद्यांना तात्पुरत्या स्वरूपात याठिकाणी ठेवण्यात येते.
तसेच डॉन बोस्को शाळेमध्येही विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला असून नवीन कैद्यांना त्याठिकाणी ठेवले जात असल्याची माहिती जेल अधीक्षक ए. सदाफुले यांनी दिली. या लसीकरण मोहिमेत लसीकरण केले जाणार आहे. मागील वर्षभर कोरोनाला लांब ठेवण्यात यशस्वी झालेल्या आधारवाडी कारागृहाला देखील आता कोरोनाची बाधा झाली असल्याने क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवलेल्या या कारागृहातील इतर कैद्यांना कोरोनापासून दूर ठेवण्याचे आवाहन कारागृह प्रशासनासमोर उभं ठाकलं आहे .