Sanjay Raut यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी शिवसेना नेत्यांवर आयटीचे छापे, अनेकांना 15 फेब्रुवारीची आठवण!
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केल्यानंतर सकाळीच आयकर विभागाने शिवसेना नेत्यांवर कारवाई केल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
मुंबई : राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे निकटवर्तीय तसेच शिर्डी संस्थानाचे विश्वस्त राहुल कनाल यांच्यापाठोपाठ परिवहन मंत्री अनिल परबांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्या घरी आज आयकर विभागाने छापेमारी केली आहे. महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केल्यानंतर सकाळीच आयकर विभागाने कारवाई केल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांच्या निकटवर्तीयांवरील आयकर विभागाच्या कारवाईमुळे अनेकांना संजय राऊत यांनी याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेची आठवण झाली. कारण 15 फेब्रुवारी 2022 रोजी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेणार असल्याचं आधीच जाहीर केलं होतं. त्यादिवशी सकाळीच ईडीने मुंबईत छापेमारी केली. दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तीवर ईडीने कारवाई केली. या कारवाईनंतर केलेल्या तपासाअंती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जमीन खरेदीचं प्रकरण समोर आलं आणि त्यांना ईडीने अटक केली.
तर संजय राऊत आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. तसं त्यांनी आधीच जाहीर केलं आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यापूर्वीच आज सकाळी युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल आणि शिवसेनेचे अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे संघटक संजय कदम यांच्यावर आयकर विभागाने कारवाई केली. एकाच दिवसात शिवसेना नेत्यांचे निकटवर्तीय आयकर विभागाच्या रडारवर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
संजय कदम यांच्या घरी आयकर विभागाचा छापा
परिवहन मंत्री अनिल परबांचे निकटवर्तीय समजले जाणारे संजय कदम यांच्या घरी आयकर विभागाचे अधिकारी धडकले. संजय मानजी कदम हे शिवसेनेच्या अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे संघटक आहेत. त्यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे.
राहुल कनाल यांच्याही निवासस्थानी छापा
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय तसेच शिर्डी संस्थानाचे विश्वस्त राहुल कनाल हे सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहेत. त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी छापेमारी सुरु आहे. आज आयकर विभागानं मुंबईत आणि पुण्यात छापेमारी सुरु केली आहे. आयकर विभागाचं एक पथक कनाल यांच्या वांद्रे येथील नाईन अल्मेडा इमारतीतील घरी आलं आणि त्यांनी झाडाझडती सुरू केली. यावेळी कनाल यांच्या इमारतीखाली सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ठेवला आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेना उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरावर आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. जवळपास चार दिवस हे धाडसत्र सुरु होतं. अशातच आता शिवसेनेशी संबंधित तिघांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे.