![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामात घोटाळा, काँग्रेस-राष्ट्रवादीचा गंभीर आरोप
शिवस्मारकातील गैरव्यवहाराबाबत विभागीय लेखापालांनी लिहलेले पत्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उघड केलं. प्रकल्पाची एक वीटही न रचता 80 कोटी रुपये खर्च केले गेले. हे पैसे देण्यासाठी आपल्यावर दबाव आणल्याचा अधिकाऱ्यांचा लेखी पत्रात दावा आहे.
![अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामात घोटाळा, काँग्रेस-राष्ट्रवादीचा गंभीर आरोप irregularities in work of Shivaji maharaj memorial in Arabian Sea, Serious allegation of Congress-NCP on govt अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामात घोटाळा, काँग्रेस-राष्ट्रवादीचा गंभीर आरोप](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/22125222/shivsmarak1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामात घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केला आहे. शिवस्मारकाच्या कामातील अनियमितता आणि गैरव्यवहाराबाबत कॅगच्या अधिकाऱ्यांनी तक्रार केल्याचा आरोप काँग्रेसचे सचिन सावंत आणि राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन केला आहे.
शिवस्मारकातील गैरव्यवहाराबाबत विभागीय लेखापालांनी लिहलेले पत्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उघड केलं. प्रकल्पाची एक वीटही न रचता 80 कोटी रुपये खर्च केले गेले. हे पैसे देण्यासाठी आपल्यावर दबाव आणल्याचा अधिकाऱ्यांचा लेखी पत्रात दावा आहे. सरकारने शिवस्मारकाची 121.2 मीटर उंची कायम ठेवताना पुतळ्याची उंची कमी केली आणि तलवारीची उंची वाढवली. स्मारकाची जागाही कमी करण्यात आली, असं नवाब मलिक आणि सचिन सावंतांनी सांगितलं.
टेंडर दिल्यानंतर कामात बदल करता येत नाहीत, मात्र शिवस्मारकाच्या कामात बदल केले गेले. हे करताना तांत्रिक समितीची परवानगीही घेतली नाही. 2 जूनला या विभागाच्या लेखापालने आपल्या हस्ताक्षरात एक नोट लिहिली आहे. शिवस्मारकात झालेली वाटाघाटी ही मार्गदर्शक तत्वांना धरुन नाही. शिवस्मारकाचे काम सुरु राहीले तर हलक्या प्रतीचं काम होईल अशी या नोटमध्ये भीती व्यक्त करण्यात आली आहे. निविदेच्या अटी व शर्तीचा भंग केल्याचं नोटमध्ये स्पष्ट म्हटलं आहे.
कंत्रादाराला पैसे देण्यासाठी सरकारचा दबाव होता. शिवस्मारकाच्या कामासाठी आतापर्यंत 80 कोटी रुपये खर्च झालेला आहे. शिवस्मारकाच्या कामात झालेल्या अनियमितता बघता हा प्रकल्प पुढे रेटावा की नाही, असा माझ्यापुढे गहन प्रश्न आहे, असं नोटमध्ये अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. या संपूर्ण प्रकाराची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने केली आहे.
अनियमितेची चौकशी व्हावी यासाठी केंद्रीय दक्षता आयोगाला पत्र लिहणार असून अनियमितेत केवळ अधिकारी सहभागी नाहीत तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्र्यांचा सहभाग आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस-राष्ट्रवादीने केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)