(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उद्यापासून मर्यादित स्वरूपात स्टेशनवरील आरक्षित गाड्यांचे काउंटर्स ओपन होणार
एक जूनपासून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण उद्यापासून मर्यादित स्वरूपात स्टेशनवरील काउंटर्स वर मिळणार आहे. कोकण रेल्वेने देखील विविध शहरात असे काउंटर्स ओपन करणार असल्याची माहिती दिली आहे.
मुंबई : अखेर देशात रेल्वे सेवा सुरू करण्यास हिरवा कंदील मिळाला आहे. येत्या 1 जूनपासून 200 ट्रेन सुरु केल्या जाणार आहेत. या ट्रेन्सची ऑनलाईन तिकीट बुकिंग आज सकाळी 10 वाजेपासून आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर सुरु झाली आहे. पहिल्या दोन तासात 1 लाख 49 हजार प्रवाशांनी तिकीट बुक केले. या तिकीटावर 2 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करणार आहेत. सध्या ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरु असली तरी लवकरच रेल्वे स्थानकावरही तिकीट बुकिंग सुरु होणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिली आहे.
मुंबईत उद्यापासून मर्यादित स्वरूपात स्टेशनवरील आरक्षित गाड्यांचे काउंटर्स ओपन होणार आहेत. सध्या ज्या विशेष राजधानी गाड्या आणि दोनशे एक्सप्रेस चालवल्या जात आहेत. फक्त त्याच गाड्यांचं आरक्षण या काउंटरवर मिळणार आहे. रेल्वे मंत्रालयाने काही वेळापूर्वीच आरक्षित गाड्यांचे काऊंटर सुरू करण्याची परवानगी रेल्वेच्या झोनल ऑफिसला दिली आहे. आता कोणते स्टेशन आणि त्यावरील किती काऊंटर सुरु करायचे याचा निर्णय त्या त्या झोनमधील अधिकारी गरजेनुसार घेणार आहेत. अतिशय महत्त्वाचे म्हणजे तिकीट कॅन्सल केल्यानंतर रिफंडसाठीचे काऊंटर 25 तारखेपासून उघडले जाणार आहेत. मात्र, या दोन्ही काउंटर्सची वेळ मर्यादेत असणार आहे. तसेच प्रवाशांना सोशल डिस्टन्स पाळण्याचे आणि गर्दी न करण्याचे रेल्वेकडून आवाहन करण्यात आले आहे.
लवकरच आणखी ट्रेन सुरु करणार आणि तिकीट काऊंटरवरही बुकिंग सुरु होणार : पियुष गोयल
कोणत्या रेल्वे स्थानकावर किती काउंटर्स सुरू होणार सीएसएमटी - 4 एलटीटी - 3 दादर - 2 ठाणे - 2 कल्याण - 2 पनवेल 2 बदलापूर 1
कोकण रेल्वेची विविध शहरातील 15 पीआरएस (public reservation system) काउंटर उद्या 22 मे 2020 पासून सुरू होणार आहेत. लॉकडाऊन मुळे कोकण रेल्वेच्या मार्गावरील प्रवासी वहातूक पूर्णतः बंद होती. यामुळे कोकण रेल्वेच्या मार्गावरील विविध शहरातील पीआरएस काउंटरही बंद होते. मात्र, उद्यापासून विविध शहारातील पीआरएस काउंटर सुरू होत आहेत. माणगाव खेड चिपळूण रत्नागिरी कणकवली कुडाळ सावंतवाडी थिविम करमाळी मडगाव कारवार उडप्पी कुमटा बेंदूर येथील कोकण रेल्वेचे काउंटर उद्यापासून सुरू होतील. कोकण रेल्वे माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ही अधिकृत माहिती दिली आहे.
राज्याअंतर्गत प्रवास करता येणार नाही. एक जूनपासून सुरु होणाऱ्या रेल्वेत महाराष्ट्र राज्यांतर्गत प्रवास करता येणार नाही. त्यामुळे राज्यात रेल्वेने प्रवास करण्यासाठी ज्यांनी आरक्षण केलं होतं. त्यांना त्यांचे सर्व पैसे परत मिळणार आहे. रेल्वे बोर्डाने जाहीर केलेल्या पत्रात ही माहिती देण्यात आली आहे.
Piyush Goyal on railway service | एक जूनपासून देशात 200 रेल्वे गाड्या सुरू होणार : रेल्वे मंत्री पियुष गोयल