(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लवकरच आणखी ट्रेन सुरु करणार आणि तिकीट काऊंटरवरही बुकिंग सुरु होणार : पियुष गोयल
सध्या ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरु असली तरी पुढील 2 ते 3 दिवसात रेल्वे स्थानकावरही तिकीट बुकिंग सुरु होणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिली आहे.
नवी दिल्ली : येत्या 1 जूनपासून 200 ट्रेन सुरु केल्या जाणार आहेत. या ट्रेन्सची ऑनलाईन तिकीट बुकिंग आज सकाळी 10 वाजेपासून आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर सुरु झाली आहे. पहिल्या दोन तासात 1 लाख 49 हजार प्रवाशांनी तिकीट बुक केले. या तिकीटावर 2 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करणार आहेत. सध्या ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरु असली तरी पुढील 2 ते 3 दिवसात रेल्वे स्थानकावरही तिकीट बुकिंग सुरु होणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिली आहे. देशभरात 1.7 लाख केंद्रांवर तिकीट बुकिंग सुरु केलं जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ट्रेन सुरु होण्याची वाट प्रवासी पाहत होते. येत्या काळात आणखी ट्रेन्स सुरु केल्या जातील, अशी माहितीही पियुष गोयल यांनी दिली.
1 जूनपासून सुरु होणाऱ्या रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट बुकिंगला आजपासून सुरुवात
देशांतर्गत विमान वाहतूक येत्या 25 मेपासून सुरु होणार, हवाई वाहतूकमंत्र्यांची माहिती
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात 25 मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून देशभरातील रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. याशिवाय हवाई वाहतूक आणि मेट्रो सेवाही बंद करण्यात आली होती. या दरम्यान देशभरातील विविध भागात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी विशेष श्रमिक रेल्वे सुरु करण्यात आल्या होत्या. त्यानंतर कालच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी येत्या 1 जूनपासून आणखी 200 ट्रेन सुरु करण्याची घोषणा केली.
Railway Booking | रेल्वे स्थानकावर 2 ते 3 दिवसांत तिकीटविक्री सुरु करण्याचे रेल्वे मंत्र्यांचे संकेत