भाजपचा ‘तो’ पदाधिकारी बांगलादेशीच; तपासातून सत्य समोर- गृहमंत्री अनिल देशमुख
चौकशीतून तो बांगलादेशी असल्याचे अनेक पुरावे पोलिसांच्या हाती आले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
मुंबई : काही दिवसांपूर्वी मालाड पश्चिमेतील मालवणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने बांग्लादेशी नागरिकांवर कारवाई केली. यात एक धक्कादायक बाब समोर आल्यामुळं आता भाजपच्या अडचणी समोर आल्या. ज्यानंतर सदर प्रकरणी तपासही करण्यात आला. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या माहितीनुसार तो पदाधिकारी बांगलादेशीच असल्याचं सत्य आता उघड झालं आहे.
भारतीय जनता पक्षाचा उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष रुबेल जोनू शेख हा बांगलादेशी असून, त्याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिकत्व घेतल्याची तक्रार आपल्यापर्यंत पोहोचली होती, त्या तक्रारीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी चालु आहे, ज्या धर्तीवर रुबेल जोनू शेख याला अटक करण्यात आली आणि चौकशीतून तो बांगलादेशी असल्याचे अनेक पुरावे पोलिसांच्या हाती आले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
रुबेल शेख हा बांगलादेशी असून त्याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिकत्व मिळविले असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी गृहमंत्र्यांक़डे केली होती. रुबेल हा भाजपचा पदाधिकारी असून या पक्षाने कोणतीही शहानिशा न करता त्याला पद कसे दिले. बेकायदेशीररित्या घुसखोरी करून मुंबईमध्ये राहणाऱ्या अशा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी काही समाज विघातक कार्य केल्यास त्याची जबाबदारी भाजप घेणार का, असे काही प्रश्नही त्यांनी उपस्थित केले होते.
बनावट माहिती...
सदर बाब गांभीर्यानं घेत त्यासंबंधीच्या चौकशीचं निवेदन व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे गृहमंत्री अनिल देशमुखांना देण्यात आलं होतं. ज्यानंतर पोलिसांनी याचा तपास केला असता चौकशीदरम्यान त्यांच्या घरात पश्चिम बंगाल राज्यातील मलापोटा ग्रामपंचायत, जिल्हा - २४ उत्तर परगणा येथील ग्रामपंचायत रहिवाशी दाखला तसेच बोलगंडा आदर्श हायस्कूल जिल्हा - नादिया येथील शाळा सोडल्याचा दाखल मिळाला होता. पोलिसांनी मलापोटा ग्रामपंचायत मध्ये जावुन चौकशी केली असता रुबेल जोनू शेख याच्या नावाचा कोणताही रहिवाशी दाखला देण्यात आलेला नाही अशी माहिती समोर आली.
तसंच जिल्हाधिकारी कार्यालय, नादिया पश्चिम बंगाल येथील नोंदणी तपासून पाहिली असता रुबेलकडे असलेला दाखला हा कोणा दुसऱ्याच्याच नावावर असल्याचं समोर आलं.
PHOTO : भाजप नेत्या पामेला गोस्वामींना कोकेन प्रकरणात अटक, काय आहे नेमकं प्रकरण?
तपासातून मिळालेल्या या माहितीनंतर पोलिसांनी रुबेलच्या घरात सापडलेला शाळा सोडल्याबाबतच्या दाखल्याचे जिल्हा शाळा निरीक्षक ए.स. जि. नादिया, राज्य प.बंगाल येथील रेकॉर्ड तपासून पाहिले असता सदर दाखल्यामध्ये नमूद करण्यात आलेली बोलगंडा आदर्श हायस्कुल, बोलगंडा जि. नादिया ही शाळाच अस्तित्वात नसल्याचे आढळुन आले. याच सर्व बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यानं आधार कार्ड आणि पॅनकार्डसुध्दा काढल्याचे तपासात समोर आले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
दरम्यान, जपचे काही लोक गोमातेची तस्करी करत असल्याचे समोल आलंय तर काही आयएसआय एजंटही सिद्ध झाले आहेत. पण, आता भाजपच्या मुंबईतील अल्पसंख्यांक कक्षाचे अध्यक्ष रुबेल शेख हे बांग्लादेशी असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला होता. ज्यावर पलटवार करत भाजपचा कुठलाही कार्यकर्ता बांग्लादेशचा नाही. मला सचिन सावंत यांना विचारायचं नाही की त्यांच्या अध्यक्षा कुठल्या देशाच्या आहेत. मी ते विचारणार नाही. पोलिसांकडे कागदपत्र असतील तर त्यांनी कारवाई करावी, अशा शब्दांत उत्तर दिलं.