(Source: ECI/ABP News/ABP Majha)
यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईतील मानाच्या गणपतींचे दर्शन ऑनलाईन पद्धतीनेच प्रयत्न
मुंबईतील गणेशोत्सव संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. 3 फूटांपासून 22 फूटपर्यंत उंचीच्या गणेश मूर्ती मुंबईतील विविध मंडळांमध्ये विराजमान होत असतात. नवसाला पावणाऱ्या गणेश मूर्ती असल्याची भावना गणेश भक्तांमध्ये असल्यामुळे या उत्सवामध्ये मोठ्या संख्येने भाविक या उत्सवात सहभागी होत असतात.
मुंबई : सध्या महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट असल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा. मुंबईतील गणेश मंडळांनी आपल्या गणेश मूर्ती चार फुटाच्या करून हा उत्सव साजरा करावा, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. या आवाहनाला मुंबईतील प्रमुख गणेश मंडळांनी आणि मुंबईकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. तर गणेशोत्सवामध्ये मुंबईतील मानाच्या गणेश मूर्तींचे दर्शन भाविकांसाठी घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णयही या मंडळांनी घेतलेला आहे.
मुंबईतील गणेशोत्सव संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. 3 फूटांपासून 22 फूटपर्यंत उंचीच्या गणेश मूर्ती मुंबईतील विविध मंडळांमध्ये विराजमान होत असतात. नवसाला पावणाऱ्या गणेश मूर्ती असल्याची भावना गणेश भक्तांमध्ये असल्यामुळे या उत्सवामध्ये मोठ्या संख्येने भाविक या उत्सवात सहभागी होत असतात. मुंबईतील प्रमुख मानाच्या गणेश मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातून लाखो भाविक मुंबईत दाखल होत असतात. तर गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये देखील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. त्यामुळे मुंबईतील गणेशोत्सव आपली एक वेगळी छाप पाडून जात असतो. मात्र या उत्सवावर सध्या कोरोनाचं संकट आलेलं आहे. राज्यासह मुंबईतील गणेश मंडळांनी यंदा आपल्या गणेश मूर्ती चार फुटांच्या करून हा उत्सव साजरा करावा, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे.
मुंबईतील प्रसिद्ध गणेश गल्लीतील गणेश मंडळांनी यापूर्वीच आपल्या गणेश मूर्तीची उंची 4 फूट असेल, असं जाहीर केलं होतं. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला या मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तर लालबागच्या गणेश मंडळाने आपण प्रशासनाच्या निर्णयासोबत असल्याचं सांगितलं आहे.
मागच्या वर्षी राज्यात महापूर आला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध मंडळांनी आपला गणेश उत्सव थोड्या प्रमाणात साजरा करून गणेशोत्सवानिमित्त जमणारी वर्गणी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये सुपूर्त केली होती. यंदा संपूर्ण देशभर कोरोनाचं संकट असल्यामुळे भाविकांना या दरम्यान कोणताही त्रास होऊ नये आणि कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी विविध मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव हा छोट्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर मुंबईतील प्रमुख मंडळांनी आपल्या गणेश मूर्तींचे दर्शन भाविकांसाठी ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाविकांना घरबसल्या मुंबईतील मानाच्या गणपती मूर्तींचे दर्शन घेता येणार आहे.
आम्ही दरवर्षी गणेश गल्लीमध्ये 22 फूट गणेश मूर्तीची स्थापना करत असतो. तसेच भव्य देखावा मंडळाच्या वतीने सादर करण्यात येतो. गणेश गल्लीतील गणेश मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक या उत्सवामध्ये येत असतात. यंदा कोरोना संकट आल्यामुळे आम्ही आमच्या मंडळाच्या गणेश मूर्तीची उंची चार फूट करण्याचं यापूर्वीच जाहीर केलं होतं. कालच मुख्यमंत्र्यांनी गणेश मूर्तीच्या उंची संदर्भात चार फूटांची घोषणा केल्यामुळे आम्हाला विशेष आनंद होत आहे. भाविकांना घरबसल्या गणेश मूर्तीचे दर्शन मिळावं यासाठी आम्ही ऑनलाईन गणेश दर्शनावर अधिक भर देत आहोत, असं गणेश गल्ली गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं.
संपूर्ण जगभरामध्ये 'लालबागचा राजा' प्रसिद्ध आहे. दरवर्षी देश-विदेशातील भाविक आवर्जून लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी दाखल होत असतात. त्यामुळे या उत्सवाला एक वेगळंच स्वरूप प्राप्त झालेलं आहे. लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ हे शासनास सोबत आहे . शासन जो निर्णय घेईल त्याचे आम्ही स्वागत करू. मात्र सध्या लालबागचा राजा गणेश मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी होणार आहे. या सभेमध्ये आम्ही आमचा निर्णय घेऊ, लालबागचा राजा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं.