NCP Meeting | परमबीर सिंह यांच्या 'लेटर बॉम्ब'नंतर राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक
राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक आज संध्याकाळी 7 वाजता पार पडणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात ही बैठक पार पडणार आहे.

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या 'लेटर बॉम्ब'नंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. परमबीर सिंह यांनी 100 कोटींच्या वसुलीचा दावा करत गृहमंत्री अनिल देशमुख यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची देखील मोठी अडचण झाली आहे. सध्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक आज संध्याकाळी 7 वाजता पार पडणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात ही बैठक पार पडणार आहे.
परमबीर सिंह यांच्या दाव्यानंतर शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्या काल फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. गृहमंत्र्यांवर गंभीर आरोपांनंतर विरोधक काहीसे आक्रमक झाले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याबाबत काय भूमिका घ्यायची यावर शरद पवार चर्चा करण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळे देखील या बैठकीत उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तर संजय राऊत देखील शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे.
कुणाला तरी खुश करण्यासाठी पत्र- जयंत पाटील
कुणाला तरी खुश करण्यासाठी परमबीर सिंह यांनी हे पत्र लिहिलं असावं. मुकेश अंबानी यांच्या घराबाहे सापडलेल्या स्फोटकांप्रकरणातून सुटण्यासाठी परमबीर सिंह यांनी पत्राचा घाट घातल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच सचिन वाझे आणि शिवसेना यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्य सरकारने या प्रकरणाच्या खोलात जाऊन तपास घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यातूनच हे पत्र आल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं.
'100 कोटींची गोष्ट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह शरद पवारांना ठाऊक!', भाजपचा आरोप
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप लगावले आहेत, ते अतिशय धक्कादायक आणि निंदनीय आहेत. आता हे स्पष्ट आहे की ठाकरे सरकार भ्रष्ट आहे. त्यामुळे केवळ अनिल देशमुखांनीच नव्हे तर संपूर्ण ठाकरे सरकारने सत्तेतून पाय उतार व्हावे. चंद्रकांत पाटील यांनी पुढे म्हटलं की, महाराष्ट्राच्या राजकारणाचे गुन्हेगारीकरण झालेलं आहे हे या ठाकरे सरकारने पदोपदी सिद्ध केले. अनिल देशमुख हे सचिन वाझेंना महिना 100 कोटी रुपयांची वसुली करायला सांगायचे. पोलिसांना वसूली करायला लावणारा गृहमंत्री महाराष्ट्र कदापी सहन करु शकत नाही.
परमबीर सिंह यांचा लेटर बाँम्ब! जाणून घ्या या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं...























