Housing Prices : बजेटमधील घरं घेण्याचं स्वप्न भंगणार! अंबरनाथ-बदलापूर शहरातील घरांच्या किमतीत वाढ
Housing Prices : बांधकामासाठी लागणारे साहित्य तब्बल 40 टक्क्यांनी महागले आहे. या महागाईचा परिणाम सर्व सामान्य नागरिकांवर होत आहे.
Housing Prices : युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा विपरीत परिणाम भारतात पाहायला मिळत आहे. या युद्धाचा थेट फटका बांधकाम व्यवसायाला बसला आहे. दोन्ही देशांतील युद्धामुळे बांधकामासाठी लागणारे साहित्य तब्बल 40 टक्क्यांनी महागले आहे. या महागाईचा परिणाम सर्व सामान्य नागरिकांवर होत आहे. त्यामुळे परवडणाऱ्या घरांसाठी प्रसिद्ध असलेल्या अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील घरांच्या किमती आता वाढणार आहेत. प्रति चौरस फूट 500 रुपयांपर्यंत ही वाढ केली जाणार असल्याची घोषणा अंबरनाथ-बदलापूर बिल्डर असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
मुंबई आणि ठाण्यानंतर सर्वसामान्य चाकरमान्यांसाठी परवडणारी घरे मिळण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून अंबरनाथ आणि बदलापूर शहराकडे पाहिले जाते. गेल्या काही वर्षात मध्यमवर्गीय चाकरमानी हक्काच्या घरांसाठी या शहरांकडे वळले आहेत. त्यामुळे या दोन्ही शहरांची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. परवडणाऱ्या घरांच्या वाढत्या मागणीकडे पाहता देशभरातील गृह प्रकल्प उभारणार्या नामांकित संस्था अंबरनाथ आणि बदलापूर शहरात गृह प्रकल्प बांधण्यासाठी उतरले आहेत. परिणामी दोन्ही शहरात मोठ-मोठी गृहसंकुले उभे राहत आहेत.
बांधकाम साहित्याचे दर दिवसेंदिवस वाढत असून बांधकाम मजुरीचे दर ही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. या महागाईचा फटका बांधकाम व्यवसायिकांना बसत आहे. अशावेळी दर्जा टिकवून ठेवण्यासाठी ही दरवाढ गरजेची असल्याचे अंबरनाथ-बदलापूर बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष अजय ठाणेकर यांनी सांगितले आहे.
बांधकाम साहित्याचे दर 40 ते 50 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे परवडणारी घरे देणे अशक्य वाटते. त्यात महारेराच्या नियमामुळे सर्वांना अनेक मर्यादा आल्या आहेत. परिणामी बांधकाम खर्च वाढला आहे. त्यामुळे घरांच्या किमती वाढणार आहेत,असे बिल्डरांनी सांगितले.
अंबरनाथ-बदलापूर बिल्डर असोसिएशनच्या वतीने घरांच्या किंमतीत वाढ करण्यात आलीय. या दोन्ही शहरातील घरांच्या किमती प्रति चौरस फूट पाचशे रुपयांनी वाढवले जाणार असल्याची घोषणा या असोसिएशनने केली आहे. नुकतीच दोन्ही शहरातील असोसिएशनमधील बांधकाम व्यावसायिकांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला असल्याचे संबाजी शिंदे यांनी सांगितले.
फेब्रुवारी 2022 मध्ये स्टीलची किंमत प्रति किलो 42 रूपये होती. ता आता मार्च 2022 मध्ये 81 रूपयांवर पोहोचली आहे. तर 50 कोलोची सिमेंटची गोणी 2022 च्या फेब्रुवारी मध्ये 290 रुपयांची होती. ती आता 2022 मार्च मध्ये 425 रुपये झाली आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये विटांची किंमत 9 रुपये एक नग असी होती. ती मार्च 2022 मध्ये 15 रुपये झाली आहे.
महत्वाच्या बातम्या