(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पहिला वातावरण कृती आराखडा तयार करण्याचा मान मुंबईला, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले लोकार्पण
Mumbai's first Climate Action Plan : 'नेट झिरो' लक्ष्य निश्चित करण्यासाठी भारतातील पहिला वातावरण कृती आराखडा तयार करण्याचा मान मुंबईने मिळवला आहे.
2050 पर्यंत नेट-झिरो उत्सर्जन साध्य करणे हे एमकॅपचे उद्दीष्ट आहे. आधारभूत वर्षातील (2019) उत्सर्जन लक्षात घेता अंतरिम आणि दीर्घकालीन लक्ष्यानुसार 2030 पर्यंत उत्सर्जनात 30 टक्के घट, 2040 पर्यंत 44 टक्के घट आणि 2050 पर्यंत नेट-झिरो उद्दीष्ट साध्य करायचे आहे. आधारभूत वर्ष 2019 मध्ये एकूण 23.42 दशलक्ष टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन (CO2e) किंवा प्रतिव्यक्ती 1.8 टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन मोजण्यात आले आहे.
वातावरण बदलानुसार क्षेत्रनिहाय अनुकूलता प्राप्त करणे आणि वातावरण बदलांच्या जोखमीची तीव्रता कमी करण्याच्या, नियंत्रण मिळवण्याच्या उपाययोजना देण्यासाठी एमकॅप सहा क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करतो. ऊर्जा सक्षमता उभारणी अंतर्गत, एमकॅप मुंबईचे एनर्जी ग्रिड डिकार्बनाइज करणे आणि ऊर्जा सक्षमता उभारणी आणि बदलत्या वातावरणास सक्षम पायाभूत सुविधा यावर भर देतो. तर शाश्वत वाहतूक (Sustainable Mobility) अंतर्गत यंत्र विरहीत (नॉन मोटराइज्ड) वाहतूक सुविधा आणि शून्य उत्सर्जन इंधनावर ठोस जोर देत कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या वाहतूक पर्यायांना प्रोत्साहन देणे यावर भर देतो. शाश्वत कचरा व्यवस्थापन अंतर्गत कचरा व्यवस्थापनात शून्य जमीन भराव योजनेची अंमलबजावणी करण्याचा एमकॅप प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे, शहरातील हिरवाई आणि जैवविविधता संकल्पना ही पाणी-आरोग्य स्वच्छता याबाबतचे असमानत्व कमी करुन वातावरण बदलाच्या अनुषंगाने सक्षमता वाढविणे आणि पाणी संवर्धन आणि पूराच्या जोखीमींचे व्यवस्थापन करण्यासाठी निसर्गाधारित उपाययोजनांचा अंगीकार करणे यावर लक्ष केंद्रीत करते. तर शहरातील पूरपरिस्थिती आणि जल संसाधन व्यवस्थापन संकल्पना ही उष्णतेची जोखीम कमी करणे आणि शहरातील पूर घटनांदरम्यान सक्षमता वाढविणे यावर भर देते. हवा निरीक्षण यंत्रणा सुधारुन हवा प्रदूषण कमी करणे, प्रभावीपणे नियम लागू करणे आणि स्वच्छ तंत्रज्ञान वापरात आणणे याची एमकॅप कल्पना मांडते.