Mumbai Hijab Ban In College : बुरखा बंदीवरुन मुंबईतील चेंबूरच्या आचार्य कॉलेजमध्ये तणाव, नेमकं काय घडलं?
Mumbai Hijab Ban : चेंबूरमधील आचार्य महाविद्यालयात बुरखा बंदीच्या मुद्यावरुन कॉलेजच्या प्रवेशद्वारावर काही वेळ तणाव पाहायला मिळाला होता.
Mumbai Hijab Ban In College : काही महिन्यांपूर्वी कर्नाटकमध्ये झालेल्या बुरखा बंदीच्या वादानंतर आता मुंबईतही (Mumbai News) असाच वाद निर्माण होतोय का, असे चित्र निर्माण झाले आहे. मुंबईतील चेंबूर (Chembur) भागात आचार्य महाविद्यालयात गणवेश सक्ती आणि बुरखा बंदी ( Hijab Ban) करण्यात आली आहे. त्यानंतर महाविद्यालयात बुरखा परिधान करुन येणाऱ्या विद्यार्थीनींना प्रवेश करण्यास मज्जाव केला. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. कॉलेज प्रशासन बुरखा घालून येणाऱ्या विद्यार्थ्यांना परवानगी देणार नाही यावर ठाम असल्याची माहिती आहे.
चेंबूरच्या एन. जी. आचार्य आणि डी. के. मराठे कॉलेजमध्ये गणवेशवर बुरखा घालून कॉलेजमध्ये प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला. महाविद्यालय प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयावर मुस्लिम आणि इतर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. महाविद्यालयात प्रवेश केल्यानंतर बुरखा काढू अशी भूमिका विद्यार्थीनींनी घेतली. महाविद्यालयाच्या गणवेश परिधान करण्याबाबत काहीच हरकत नाही. मात्र, कॉलेजच्या आतमध्ये बुरखा काढण्यास जागा उपलब्ध करुन द्यावी तिथे बुरखा काढून विद्यार्थिनी येतील अशी भूमिका यावेळी विद्यार्थीनींनी मांडली. मात्र, महाविद्यालय प्रशासनाने आपली भूमिका ठाम ठेवली. त्याच्या परिणामी काही वेळ महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
आचार्य आणि डी. के. मराठे महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थिनी कॉलेजमध्ये आत आल्यानंतर अनेक वर्षापासून आणि नवीन विद्यार्थीनीदेखील आपला बुरखा बदलून कॉलेजचा युनिफॉर्म परिधान करतात.
या प्रकाराची माहिती मिळताच, तातडीने पोलीस महाविद्यालयाच्या ठिकाणी दाखल झाले. पोलिसांनी महाविद्यालयाच्या प्राचार्या, इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू केली आहे.
>> आचार्य आणि मराठे कॉलेजचं प्रकरण काय?
- आचार्य आणि मराठे कॉलेजमध्ये कॉलेजचा युनिफॉर्म आहे
- युनिफॉर्म सर्वांना बंधनकारक आहे. मात्र कॉलेज सुरू झाल्यावर ज्यांनी युनिफॉर्म घेतलेला नाही त्यांच्यासाठी काही दिवस ही अट नाही
- मुस्लिम समुदायाच्या विद्यार्थिनी देखील या कॉलेजमध्ये येतात
- या विद्यार्थिनी कॉलेजमध्ये आत आल्यानंतर अनेक वर्षा पासून आणि नवीन विद्यार्थी आपला बुरखा बदलून कॉलेजचा युनिफॉर्म घालतात
- मात्र कॉलेज प्रशासनाने आता बुरखा हा बाहेरच काढून या असा नवीन फतवा काढल्याचा आरोप बुरखा घालणाऱ्या विद्यार्थिनींचा, पालकांचा आणि काही विद्यार्थी संघटनांचा आहे.
- कॉलेज प्रशासनाने मात्र यावर अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. कॉलेज प्रशासन आपले म्हणणे पोलिसांशी चर्चा करून मांडतील असे सांगण्यात आले आहे.