Gunratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी, इतर 109 जणांना न्यायालयीन कोठडी; न्यायालयाचा निर्णय
Gunratna Sadavarte Bail news Update Mumbai : काल रात्री गुणरत्न सदावर्तेंना अटक केल्यानंतर आज त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी त्यांची बाजू अॅड महेश वासवानी यांनी मांडली.
Gunratna Sadavarte Bail ST Strike : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अॅड गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवासांची पोलीस कोठडी सुनावली आहे. काल, शुक्रवारी रात्री अॅड. गुणरत्न सदावर्तेंना अटक केल्यानंतर आज त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं होतं.
अॅड. गुणरत्न सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावताना इतर 109 जणांना मात्र न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी काल अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यानंतर राज्यभर तणावाचे वातावरण आहे. कालच्या घटनेच्या विरोधात आज राष्ट्रवादीकडून राज्यभर आंदोलन केलं जात आहे. या हल्ल्यासाठी सदावर्ते जबाबदार असल्याचा ठपका त्यांच्यावर आहे.
सदावर्ते यांच्या भाषणामुळे कामगारांनी हे कृत्य केलं- सरकारी वकील
सरकारी वकिलांनी सुनावणीदरम्यान म्हटलं होतं की, वकील गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची पोलिस कोठडी द्या, आरोपीवरील कलम गंभीर आहेत. त्यांनी कामगारांना भडकावलं. आरोपांची संख्या मोठी असल्यानं त्यांची चौकशी कशी करणार? असं न्यायाधीशांनी म्हटलं. त्यावर बोलताना सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटलं की, सीसीटीव्ही फुटेजेस आहेत. आरोपी क्रमांक 1 सदावर्ते हेच यामागे एकटे नसून अजून काही जण त्यांच्यासोबत असणार म्हणून आम्हाला चौकशी करायची आहे. कोण कोण ॲक्टिव्हली यात इन्व्हॉल होतं यासंबंधी चौकशी करायची आहे. सदावर्ते यांच्या भाषणामुळे कामगारांनी हे कृत्य केलंय. पोलिसांवर देखील हल्ला करण्यात आलाय. दगडफेक आणि चप्पलफेक करण्यात आलीय. दोन जण जखमी झालेत. रक्ताचे नमूने घेतले आहेत. दारु पिऊन कामगार होते अशी शंका होती. काही जण आपलं नाव खोटं सांगतायत, सोबत पत्ता देखील सांगत नाही आहेत. यासाठी देखील चौकशी करायची आहे. ते खरंच एसटी कामगार आहेत की भाडोत्री होते. हे देखील चेक करायचंय. आज पहिली रिमांड आहे त्यामुळे या बेसिक गोष्टी माहिती हव्यात त्यामुळे रिमांडची मागणी करतो, असं घरत यांनी म्हटलं.
सरकारच्या विरोधात मोठा आवाज सदावर्ते यांनी उचलला
यावर बोलताना अॅड. सदावर्ते यांचे वकील म्हणाले की, गुणरत्न सदावर्ते पीएचडी आहेत. जयश्री पाटील ह्या देखील पीएचडी आहेत. मराठा आंदोलन सदावर्ते यांनी रद्दबातल केलं. सोबतच त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. सदावर्ते हे बार काऊन्सिलमध्ये देखील मोठ्या फरकाने विजयी झाले. सरकारच्या विरोधात मोठा आवाज सदावर्ते यांनी उचलला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यात. कोणत्याही सत्ताधारी राज्यकर्त्यांनी त्यांना विचारलं नाही. एका सुपरस्टारच्या मुलाला अटक होते आणि सर्व त्यावर बोलायला लागतात, असं सदावर्ते यांचे वकील महेश वासवानी यांनी म्हटलं.
सदावर्ते यांनी शांततेचं आवाहन केलं होतं- सदावर्तेंचे वकील
अॅड महेश वासवानी म्हणाले की, मराठा आरक्षणाविरोधात जयश्री पाटील यांनी याचिका केली त्याबद्दल युक्तीवाद सदावर्ते यांनी केला आहे. यामुळे त्यांना नेहमी चुकीची वागणूक दिली जायची.आज सादर केलेल्या FIR मध्ये अनेक गोष्टी या मॅाडीफाईड केल्या गेल्या आहेत. आम्ही मुंबईत आंदोलनाबाबत कुठेच नाही बोललो. आम्ही बारामतीत बोललोय आणि घुसून आंदोलन करा वगैरे आम्ही कुठेच बोललो नाही आहे. कोणत्याच चॅनेलवर आम्ही असं बोललो नाही. घटनेवेळी देखील सदावर्ते तिथे नव्हते. ते मॅट कोर्टात होते. एका पत्रकाराने त्यांना विचारले की तुमची भूमिका काय तेव्हा त्यांनी शांततेचं आवाहन केलं होतं. 92 हजार कर्मचाऱ्यांची केस होती. ते त्यात यशस्वी झालेत. आणि त्याचा राग म्हणून सरकार हे करतंय. सदावर्ते यांनी नेहमीच शांतता पाळा, असं सांगितलं होतं. आंदोलनावेळी देखील ते सातत्यानं हे म्हणत होते. जयश्री पाटील यांनी 100 कोटी रुपयांच्या अनिल देशमुखांच्या गैरव्यवहार प्रकरणी देखील दावा दाखल केला होता. सदावर्ते यांना ताब्यात घेताना नोटीस देखील देण्यात आली नाही. यातूनच सरकारचा रोष बघायला मिळत आहे. माझ्याकडे घटनास्थळीचे सीसीटीव्ही आहेत. मात्र कुठेही सदावर्ते नाहीत, असं सदावर्तेंच्या वकिलांनी म्हटलं आहे.
मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
यावेळी यलो गेट पोलिस स्टेशनच्या प्रवेशद्वारावर तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कागदपत्रे पाहिल्यानंतर केवळ पोलीस कर्मचारी आणि इमिग्रेशन कार्यालयात येणाऱ्या लोकांना परवानगी आहे. अटक करण्यात आलेल्या 104 महिला कर्मचाऱ्यांसह एसटी कर्मचाऱ्यांना आतमध्ये ठेवण्यात आले आहे. सुरक्षेचे कारण पाहता येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
काल हायकोर्टाच्या निर्णयानंतर काही एसटी आंदोलकांनी दगडफेक आणि चप्पलफेक करत गोंधळ घातला. शरद पवार यांच्या घरावर हल्ला प्रकरणी गावदेवी पोलिसांनी अॅड गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली. शरद पवारांच्या घरावर हल्ला करणारे 103 आंदोलकांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
सदावर्तेंची चार तास वैद्यकीय चाचणी
अॅड गुणरत्न सदावर्ते यांना रात्री अकरा वाजता अटक केल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी आधी नायर आणि मग जेजे रुग्णालयात नेण्यात आले. सुमारे चार तास त्यांची मेडिकल जेजे मध्ये करण्यात आली. शरद पवार डर्टी पॉलिटिक्स करतात असा आरोप सदावर्तेंच्या पत्नी अॅड जयश्री पाटील यांनी केला होता. गुणरत्न सदावर्तेंची अटक बेकायदेशीर असा दावाही त्यांनी केला आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या :
- Sharad Pawar : नेता जर शहाणा नसला तर कार्यकर्त्यांवर दुष्परिणाम होतो; शरद पवारांचा सदावर्तेंवर नाव न घेता हल्लाबोल
- Sharad Pawar : हंगामा कोण केला याची लाय डिटेक्टर चाचणी करा: अॅड. गुणरत्न सदावर्ते
- Sharad Pawar : गुणरत्न सदावर्तेंची भाषणं तपासली पाहिजेत, त्यांनीच कर्मचाऱ्यांना उकसवलं; हसन मुश्रीफांचा आरोप