सचिन तेंडुलकरकडून रणजितसिंह डिसले गुरुजींचं कौतुक, 'या' कारणासाठी केलं विशेष अभिनंदन
'ग्लोबल टीचर प्राईज' पुरस्कार (global teachers prize award) प्राप्त केल्यानंतर दिग्गजांकडून रणजितसिंह डिसले Ranjitsinh Disale गुरुजींवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. आता मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरनं sachin tendulkar डिसले गुरुजींना ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई: युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 'ग्लोबल टीचर प्राईज' पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना मिळाला आहे. या पुरस्कारानंतर दिग्गजांकडून डिसले गुरुजींवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. आता मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरनं डिसले गुरुजींना ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. आयुष्यात शिक्षण ही सर्वात मौल्यवान भेट आहे. शिक्षण क्षेत्रात विशेषत: मुलींना शाळांमध्ये परत येण्यास मदत केल्याबद्दल आणि ग्लोबल टीचर प्राईझ जिंकल्याबद्दल डिसले यांचं अभिनंदन असं सचिननं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. सचिननं या ट्वीटमध्ये डिसले गुरुजींचा अवार्ड जिंकल्यानंतरचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
Education is the most valuable gift one can give. Heartiest congratulations to @ranjitdisale on winning the #GlobalTeacherPrize for his work in the field of education, especially for helping young girls get back to school.pic.twitter.com/WWvd7OcnK0
— Sachin Tendulkar (@sachin_rt) December 7, 2020
काल राज्य सरकारकडून गौरव, मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक जागतिक स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना मिळाला याबद्दल अभिमान असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल काढले. डिसले यांच्यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग राबविणाऱ्या राज्यातील शिक्षकांना सोबत घेऊन शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत अव्वल दर्जाचे शिक्षण पोहचविण्यासाठी आराखडा तयार करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. रणजितसिंह डिसले यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन काल सत्कार करण्यात आला. सोलापूरसारख्या दुष्काळी समजल्या जाणाऱ्या भागातील जिल्हा परिषदेतील शिक्षकाने हा पुरस्कार मिळविला ही खरच अभिनंदनीय बाब आहे. या शाळांमधील काम उत्तम आहे याचा दाखला या पुरस्काराच्या रुपाने मिळाला आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री म्हणाले, तंत्रज्ञानातील नाविन्यपुर्ण प्रयोग व असामान्य कार्य यामुळे जगातील सर्वोत्तम शिक्षकांच्या क्रमवारीत ते आले आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचा ग्लोबल चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी तयार केलेली क्यु आर कोडेड पुस्तके राज्यातील एक कोटीहून अधिक मुले वापरत असून जगभरातील देशातील शाळांमध्ये याची अंमलबजावणी सुरु आहे, असं अजित पवार म्हणाले.
युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 'ग्लोबल टीचर प्राईज' पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना मिळाला आहे. 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार डिसले यांना जाहीर झाला आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे रणजितसिंह पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. जगभरातील 140 देशांतील 12 हजारहून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले असून, यामुळे 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंडकरता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवनवीन प्रयोग करण्यास चालना मिळेल.
'ग्लोबल टीचर प्राईज' विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांचं दलाई लामा यांच्याकडून कौतुक!
रणजीत डिसले यांचं कार्य?
लेट्स क्रॉस द बॉर्डर या अभिनव शैक्षणिक प्रयोगाच्या माध्यमातून भारत, पाकिस्तान, इराक, इराण, इस्रायल, पॅलेस्टाईन, अमेरिका आणि उत्तर कोरिया या जगातील सर्वात अशांत देशांतील 50000 मुलांची पीस आर्मी तयार करुन परस्पर सौहार्दाचे वातावरण करण्याच्या या शैक्षणिक प्रयोगाकरिता त्यांची निवड करण्यात आली आहे. तंत्रस्नेही शिक्षणाच्या माध्यमातून शांतता निर्माण करण्याचा हा प्रयत्न इतर देशांतील शिक्षकांना प्रेरणादायी आहे, अशा शब्दात निवड समितीने त्यांचा गौरव केला आहे. रणजीतसिंह डिसले सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडीच्या शाळेत मागील 11 वर्षांपासून कार्यरत आहेत.
रणजीत डिसले गुरुजी हे तंत्रज्ञानातील अभिनव प्रयोगांमुळे जगभर ओळखले जातात. जगभरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना ते ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन करत असतात. डिसले गुरुजींनी तयार केलेली QR कोडेड पुस्तके आज 11 देशांतील 10 कोटींहून अधिक मुले वापरत आहेत. व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप या आगळ्यावेगळ्या अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून ते 150 हून अधिक देशांतील शाळांमध्ये विज्ञान विषयाचे अध्यापन करतात. अशा पद्धतीने अध्यापन करणारे ते जगातील सातवे शिक्षक ठरले आहेत. याआधी मायक्रोसॉफ्ट, नॅशनल जिओग्राफिक सोसायटी या आंतरराष्ट्रीय संस्थांनी रणजितसिंह डिसले यांच्या कार्याचा गौरव केला आहे.