'ग्लोबल टीचर प्राईज' विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांचं दलाई लामा यांच्याकडून कौतुक!
मला खात्री आहे की तुमची अनुकरणीय सेवा इतरांना तुमच्या पावलांवर पाऊल टाकण्यास प्रोत्साहित करेल, असं दलाई लामा यांनी म्हटलं.
मुंबई : सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 'ग्लोबल टीचर प्राईज' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कारासोबत त्यांना सात कोटी रुपयांची रक्कमही देण्यात आली. पुरस्कार मिळल्यानंतर देशभरातून रणजितसिंह डिसले यांच्या अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. आता दलाई लामा यांनीही पत्रक काढून डिसले यांचं अभिनंदन केलं आहे.
दलाई लामा यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, जगातील सर्वात अपवादात्मक शिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन. तसेच स्पर्धेत उपविजेते शिक्षकांना निम्म्या बक्षिसाच्या रक्कमचे वाटप करण्याच्या आपल्या औदार्याबद्दल तुमचे कौतुक करतो. लहान मुलांना, विशेषत: गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून वैयक्तिकरित्या मदत करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. एक चांगले जग निर्माण करण्यात तुमचं योगदान आहे.
वंचित मुली शाळेत जात आहेत हे सुनिश्चित करण्याचे आपले काम तसेच त्यांच्यासाठी त्यांच्या भाषेत अभ्यास साहित्य तयार करण्याचा आपण प्रयत्न केले. आपण 83 देशांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे देत आहात, हे उत्तम काम आहे. जेव्हा तुम्ही म्हणाल, आम्ही एकत्रितपणे बदल घडवू, तेव्हा आपण जगाला एक चांगली जागा बनवू शकू. तेव्हा तुम्ही अगदी बरोबर आहात. मला खात्री आहे की तुमची अनुकरणीय सेवा इतरांना तुमच्या पावलांवर पाऊल टाकण्यास प्रोत्साहित करेल, असं दलाई लामा यांनी म्हटलं.
ग्लोबल टिचर्स पुरस्कार नेमका आहे काय?
यात जगातील सर्वोत्तम 50 शिक्षकांची याकरता निवड करण्यात आली आहे. लंडन येथील वार्की फाऊंडेशनच्या वतीने 10 लाख अमेरिकन डॉलर्सचा हा पुरस्कार आहे. लंडन येथील ग्लोबल एज्युकेशन अँड स्किल फोरम या कार्यक्रमात हा पुरस्कार रणजीत डिसले यांना प्रदान करण्यात आला.
रणजीत डिसले यांचं कार्य?
लेट्स क्रॉस द बॉर्डर या अभिनव शैक्षणिक प्रयोगाच्या माध्यमातून भारत, पाकिस्तान, इराक, इराण, इस्रायल, पॅलेस्टाईन, अमेरिका आणि उत्तर कोरिया या जगातील सर्वात अशांत देशांतील 50000 मुलांची पीस आर्मी तयार करुन परस्पर सौहार्दाचे वातावरण करण्याच्या या शैक्षणिक प्रयोगाकरिता त्यांची निवड करण्यात आली आहे. तंत्रस्नेही शिक्षणाच्या माध्यमातून शांतता निर्माण करण्याचा हा प्रयत्न इतर देशांतील शिक्षकांना प्रेरणादायी आहे, अशा शब्दात निवड समितीने त्यांचा गौरव केला आहे. रणजीतसिंह डिसले सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडीच्या शाळेत मागील 11 वर्षांपासून कार्यरत आहेत.
रणजीत डिसले गुरुजी हे तंत्रज्ञानातील अभिनव प्रयोगांमुळे जगभर ओळखले जातात. जगभरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना ते ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन करत असतात. डिसले गुरुजींनी तयार केलेली QR कोडेड पुस्तके आज 11 देशांतील 10 कोटींहून अधिक मुले वापरत आहेत. व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप या आगळ्यावेगळ्या अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून ते 150 हून अधिक देशांतील शाळांमध्ये विज्ञान विषयाचे अध्यापन करतात. अशा पद्धतीने अध्यापन करणारे ते जगातील सातवे शिक्षक ठरले आहेत. याआधी मायक्रोसॉफ्ट, नॅशनल जिओग्राफिक सोसायटी या आंतरराष्ट्रीय संस्थांनी रणजितसिंह डिसले यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
Global Teacher Award विजेते रणजितसिंह डिसले यांचं कार्य नेमकं काय आहे? स्पेशल स्टोरी | सोलापूर