घाटकोपर होर्डिंग दुर्घटना : होर्डिंगमधून 11 लाखांहून अधिक रक्कम लोहमार्ग पोलिसांच्या खात्यात जमा, रेल्वेचे सहाय्यक पोलिस आयुक्तांची दोन दिवस कसून चौकशी
Ghatkopar Hoarding Accident : ज्या होर्डिंगची दुर्घटना झाली, त्या होर्डिंगमधून 11 लाखाहून अधिक रक्कम ही लोहमार्ग पोलिसांच्या खात्यात जमा होत होती.
मुंबई : मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 16 निष्पापांचा जीव गेला. अनेक संसार उघड्यावर पडले. याप्रकरणी सध्या चौकशी सुरु आहे. आरोपी भावेश भिंडे सध्या अटकेत आहे. या प्रकरणात सध्या रेल्वेचे सहाय्यक पोलिस आयुक्त शहाजी निकम यांची सलग दोन दिवस चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, दुर्घटनाग्रस्त होर्डिंगच्यामार्फत लोहमार्ग पोलिसांच्या खात्यात लाखो रुपये जमा होत होते, अशी महत्त्वाची माहिती तपासात एक समोर आली आहे.
रेल्वेचे सहाय्यक पोलिस आयुक्तांती कसून चौकशी
घाटकोपर होर्डिंग प्रकरणात रेल्वेचे सहाय्यक पोलिस आयुक्त शहाजी निकम यांची सलग दोन दिवस गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली. पहिल्या तीन होर्डिंगच्या तुलनेत चौथ्या म्हणजेच पडलेल्या होर्डिंगमधून सर्वाधिक रक्कम लोहमार्ग पोलिसांच्या खात्यात जमा झाल्याचं तपासात उघड झालं आहे. पहिल्या तीन होर्डिंगमधून 13 लाखाची रक्कम मिळत होती, तर चौथ्या होर्डिंगमधून म्हणजेच ज्या होर्डिंगची दुर्घटना झाली, त्या होर्डिंगमधून 11 लाखाहून अधिक रक्कम ही लोहमार्ग पोलिसांच्या खात्यात जमा होत असल्याची माहिती चौकशीतून पुढे आली आहे.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला. यानंतर इतर तीन होर्डिंग हटवण्याची कारवाई करण्यात आली. पहिल्या तीन होर्डिंगच्या आधारेच भावेश भिंडेला चौथ्या होर्डिंगसाठी तत्कालिन पोलिस आयुक्त कैसर खालिद यांच्या सांगण्यावरून परवानगी दिल्याचे गुन्हे शाखेच्या चौकशीत निकम यांनी माहिती दिल्याचं सूत्रांकडून समोर आलं आहे. होर्डिंगचं 10 वर्षाचं कंत्राटही तत्कालिन पोलिस आयुक्त कैसर खालिद यांच्या सांगण्यावरून 7 जुलै 2022 रोजी वाढवल्याची माहिती निकम यांनी चौकशीत दिल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे.
आतापर्यंत सात जणांचे जबाब नोंदवले
7 डिसेंबर 2021 पर्यंत पहिले तीन होर्डिंग 40×40 होते. मात्र त्यानंतर त्याची साईज 80×80 करण्यात आली. 19 डिसेंबर 2022 मध्ये जे पडलं ते चौथं होर्डिंग, त्याची साईज ही 140×120 करण्यात आल्याची माहिती निकम यांनी चौकशीत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणात पालिका आणि व्हिजेटिआय कॉलेजचा आढावा घेऊनच पुढील कारवाईची दिशा ठरेल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्रकरणात सहाय्यक पोलिस अधिकारी शहाजी निकम याची चौकशी बुधवारी पूर्ण झालेली आहे. आतापर्यंत सात जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :