(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कानून के हात बहुत लंबे होते है... घाटकोपर बॅनर दुर्घटनेतील मुख्य आरोपी भिंडेला राजस्थानमधून अटक
राजधानी मुंबईतील घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी भावेश भिंडे आणि जाहिरात कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : वादळी वाऱ्यानंतर घडलेल्या घाटकोपर (Ghatkopar) बॅनर दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला. बेकायदेशीरपणे बॅनर उभारुन 17 जीवांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपी भावेश भिंडेला अखेर मुंबई पोलिसांनी (Police)अटक केली आहे. राजस्थानच्या जयपूरमधून भावेशच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. घाटकोपर दुर्घटनेवरुन राजकारण तापलं असता, पोलीस प्रशासन गंभीर होताच, याप्रकरणातील आरोपी भावेश भिंडे बेपत्ता झाला होता. भावेश भिंडेच्या मागावर मुंबई पोलिसांची 7 पथकं कार्यरत होती, वेगवेगळ्या भागात भिंडेचा पोलिसांकडून शोध सुरु होता, तो राज्याबाहेर पळाल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार, पोलिसांनी शोधमोहिम राबवली होती. यापूर्वी भिंडेचे शेवटचे लोकेशन लोणावळ्यात आढळलं होतं. मात्र, आज पोलिसांनी भिंडेला राजस्थानमधून अटक केली आहे.
राजधानी मुंबईतील घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी भावेश भिंडे आणि जाहिरात कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेच्या भीतीने भिंडेने पळ काढला होता, पण अखेर मुंबई पोलिसांचे पथक भिंडेच्या मुसक्या आवळण्यात यशस्वी ठरले आहे. पोलीस पथक मागावर असल्याचे समजताच, पोलिसांचे पथक लोणावळ्यात पोहचण्यापूर्वीच भावशने आपला मोबाईल बंद केला, त्यानंतर त्याचा कोणताही थांगपत्ता लागलेला नाही. मात्र, पोलिसांनी त्याला जयपूरमधून अटक केली आहे.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 17 जणांचा जीव गेला असून 75 जण जखमी झाले आहेत. प्रशासनाकडून सुरू असलेलं येथील बचावकार्य अखेर 63 तासांनी संपल्याचं जाहीर करण्यात आलं. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घटनास्थाळाची शेवटची पाहाणी करत हे बाचवकार्य संपल्याची घोषणा केली. सोमवारी सायंकाळी मुंबईत जो सोसाट्याचा वारा आणि पाऊस आला त्यात, आशियातील सर्वात मोठ होर्डिंग अशी नोंद असलेलं घाटकोपर पूर्व द्रुतगती महामर्गावरील होर्डिंग कोसळलं. विशेष म्हणजे हे होर्डींग कोसळलं ते थेट नजीकच्या पेट्रोल पंपावरच. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला तर 75 जण जखमी झाले होते. जखमींवर नजीकच्या रूग्णालयांत उपचार सुरू आहेत. जखमी आणि मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं आर्थिक मदत जाहीर केली. या दुर्घटनेचं कारण जाणून घेण्यासाठी पालिकेनं व्हिजेटिआयची मदत मागितली. या घटनेची सारी जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असल्याचं सांगत मुंबई महापालिकेनं आधीच यातून अंग काढून घेतलंय. तर ज्या इगो मीडियाकडे या होर्डिंगचं कंत्राट होतं त्याचा मालक भावेश भिंडेचा मुंबई पोलीसांची सात पथक शोध घेतायत. दरम्यान, या दुर्घटनेनंतर होर्डींगची जबाबदारी असलेल्या कंपनीचा चालक भावेश भिंडे यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आज त्याला अटक केली. मुंबई पोलिसांनी राजस्थानच्या जयपूरमधून भावेशलला ताब्यात घेतलं आहे.
इगो मीडिया कंपनीचं बॅनर
होर्डिंग लावलेली जागा रेल्वे पोलिसांची होती. बेकायदा आणि महाकाय होर्डिंग लावायला रेल्वे पोलिसांनीच परवानगी दिली होती. हे बेकायदा काम करणारा महाभाग म्हणजे लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालीद. सगळे नियम धाब्यावर बसवून या कैसर महाशयांनी इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडला 10 वर्षांच्या काळासाठी होर्डिंग लावायला परवानगी दिली होती.