गणपती बाप्पांचे विसर्जन करताना दोघे बुडाले; पोलिसांची समुद्रात धाव, सुदैवाने दोघांचा जीव वाचला
मुंबईच्या खार पश्चिमेकडील कार्टर रोड येथे समुद्रामध्ये बुडणाऱ्या दोन तरुणांना वाचवण्यात खार पोलिसांना यश आलं आहे
मुंबई : गणपती बाप्पा मोरया म्हणत गेल्या 7 दिवसांपूर्वी घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. आता, गेल्या काही दिवसांपासून मुंबईत गणपती विसर्जन सुरू झाले आहेत. दीड दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन झाले असून पाच दिवसांचा गणपती, सहा दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन झाल्यानंतर आज 7 दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. मुंबईतील (Mumbai) अनेक ठिकाणी, तलावात, समुद्रात आणि मुंबई महापालिकेच्या नियोजित ठिकाणीही गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान, मुंबईतील खार पश्चिममध्ये गणपती (Ganpati) बाप्पांच्या विसर्जनसाठी गेलेले दोन युवक पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली होती. मात्र, खार पोलिसांनी (Police) दाखवलेल्या सतर्कतेमुळे या दोन्ही युवकांचा जीव वाचला आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबईच्या खार पश्चिमेकडील कार्टर रोड येथे समुद्रामध्ये बुडणाऱ्या दोन तरुणांना वाचवण्यात खार पोलिसांना यश आलं आहे. गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेले दोन तरुण समुद्रात बुडत असल्याची माहिती गस्तीवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली. गस्तीवर असणारे सहायक फौजदार राजू गायकवाड, पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास बाबर, पोलीस शिपाई रमेश वळवी आणि पोलीस शिपाई मोकाशी यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून समुद्रात धाव घेतली.
खार पश्चिम येथील समुद्रात बुडणाऱ्या दोन युवकांना पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचविण्यात आले. पोलिसांनी लवकरच त्यांना पाण्यातून बाहेर काढले, पण बेशुद्ध असल्याने त्यांना सी.पी.आर. देण्यात आला. त्यानंतर, दोन्ही युवकांना शुद्ध आली. मात्र, तात्काळ त्यांना पुढील उपचारासाठी वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खार पोलिसांनी तत्परता दाखवत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे नागरिकांकडून आता कौतुक होत आहे.
हेही वाचा
विधानसभेचा बिगुल वाजणार, मुंबईत आयुक्तांनी घेतला आढावा; प्रशासकीय यंत्रणा लागल्या कामाला