Girgaoncha Raja : गिरगावच्या राजाचा मुखदर्शन सोहळा, संभाजीराजे छत्रपतींना लावली हजेरी
Girgaoncha Raja : मुंबईतील सर्वात जुन्या गणेश मंडळांपैकी एक असलेल्या गिरगावच्या राजाचा मुखदर्शन सोहळा रविवार (17 सप्टेंबर) रोजी पार पडला.
मुंबई : पर्यावरण पूरक गणपती म्हणून ख्याती मिळवलेल्या गिरगावच्या राजाचा (Girgaoncha Raja) मुखदर्शन सोहळा रविवार (17 सप्टेंबर) रोजी पडला आहे. गिरगावच्या राजाच्या या मुखदर्शन सोहळ्याला छत्रपती संभाजीराजेंनी विशेष उपस्थिती लावली होती. लोकमान्य टिळकांनी गिरगावातील केशवजी नाईकांच्या चाळीतून मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली होती. त्यानंतर गिरगावात सुरु असलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा ही अखंड सुरु आहे. गिरगावाचा राजा हा मानाच्या गणपतींपैकी एक गणपती आहे. तसेच या मंडळाचा मुंबईतील सर्वात जुन्या गणपती मंडळांमध्येही समावेश होतो. तर गिरगावातील गणपती हे सर्वांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू आहेत. त्यामुळे या गणपतींचं विशेष आकर्षण हे मुंबईकरांना असतं.
असा आहे यंदाचा देखावा
शिवराज्याभिषेक सोहळ्याला यंदाच्या वर्षात 350 वर्ष पूर्ण होत आहे.हाच धागा पकडत जर छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी काय केले असतं अशा संकल्पनेतून विविध चित्र या मंडळांनी मंडपात लावली आहेत. शिवाजी महाराजांना 21 भाषा अवगत होत्या. त्यामुळे शिवाजी महाराजांची राजमुद्रा महाराष्ट्रातल्या विविध भाषांमध्ये तसेच जगातील इतर भाषांमध्ये देखील भांषातर करण्याचा प्रयत्न मंडळाकडून करण्यात आला आहे. तर या भाषांमध्ये भाषांतरित करुन ती देखील प्रदर्शित करण्यात आली आहेत.
हे आहे मूर्तीचं वैशिष्ट्य
गिरगावच्या राजाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही पूर्ण मूर्ती शाडूच्या मातीची असते. त्यामुळे पर्यावरणपूरक गणपती म्हणून या गणपतीची विशेष ख्याती आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमामध्ये देखील गिरगावच्या राजाचा उल्लेख केला होता. ही मूर्ती 25 फुटांची असते. पण संपूर्ण मूर्ती ही शाडूच्या मातीपासून बनवली जाते. मंडळाच्या याच संकल्पानेचे आणि पर्यावरण पूरकतेचे कौतुक संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. तसेच या मंडळाचा आदर्श सर्वांना घ्यावा असा आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं आहे.
शुक्रवार 15 सप्टेंबर रोजी लालबागच्या राजा आणि रविवार 17 सप्टेंबर रोजी मुंबईच्या राजाचा प्रथम दर्शन सोहळा पार पडला. शिवराज्याभिषेकाच्या 350 सोहळ्यानिमित्त बऱ्याच मंडळांनी त्याच दृष्टीकोनातून देखावा साकार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यंदा शिवराज्याभिषेक सोहळ्याचं दर्शन हे मंडळांकडून साकारण्यात आलं आहे. त्यामुळे बाप्पाच्या दर्शनासोबत शिवराज्याभिषेक सोहळ्याचा अनुभव देखील भक्तांना घेता येईल. तर यासाठी मंडळांकडून विशेष तयारी देखील करण्यात आली आहे. मुंबईतील या परिसरामध्ये पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलाय. त्यामुळे मुंबईकरांचा गणेशोत्सव यंदाही धुमधडाक्यात होणार यात शंका नाही.
हेही वाचा :
Mumbaicha Raja : मुंबईच्या राजाचा प्रथम दर्शन सोहळा, रायगड किल्ल्याची प्रतिकृती केली साकार