(Source: ECI/ABP News/ABP Majha)
माजी गृहमंत्र्यांनी वसुलीबाबत चौकशी केली; पोलीस अधिकारी राजू भुजबळ आणि संजय पाटील यांचे कबुली जबाब 'एबीपी माझाकडे'
राजू भुजबळ आणि संजय पाटील 4 मार्च 2021 रोजी अनिल देशमुख यांच्या ज्ञानेश्वर बंगल्यावर त्यांना भेटले असल्याचा उल्लेख परमबीर सिंह यांनी केला आहे. मात्र या तिघांची एकत्र बैठक झाली नसल्याचं या दोन्ही अधिकार्यांनी जबाब दिला आहे.
मुंबई : सचिन वाझे प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृह विभागाला अहवाल सादर केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटी रुपयांचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. आता पोलीस आयुक्तांच्या या अहवालातून परमबीर सिंह यांनीच सचिन वाझेंना पोलीस दलात आणण्यापासून महत्त्वाची कामे दिली हे स्पष्ट होत आहे. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख असलेल्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. राजू भुजबळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांचा कबुली जबाब 'एबीपी माझा'च्या हाती लागला आहे.
पोलीस अधिकाऱ्यांच्या जबाबामुळे परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पत्रात उल्लेख असलेले संजय पाटील यांच्या चॅटचा मजकूर आणि प्रत्यक्ष दिलेल्या जबाबात तफावत असल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबईतील 1750 बार आणि रेस्टॉरंटकडून प्रत्येक 3 लाख रुपये जमा करण्यास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना सांगितल्याचा चॅटमध्ये उल्लेख होता. मात्र प्रत्यक्ष जबाबात गृहमंत्र्यांनी स्वतःहून सचिन वाझेंना त्याबाबत विचारणा केल्याचा उल्लेख आहे.
सचिन वाझेंनी आपल्याला सांगितले की, मुंबईतील 1750 बार आणि रेस्टॉरंटकडून प्रत्यक्ष 3 लाख रुपये जमा होत असल्याची माहिती मिळाल्याची विचारणा गृहमंत्र्यांनी वाझेंकडे केली असा जबाबात उल्लेख आहे. याचा अर्थ गृहमंत्र्यांनी वाझेंना पैसे जमा करण्यास सांगितले नव्हते, तर गृहमंत्र्यांनीच असा प्रकार मुंबईत सुरू आहे का? अशी विचारणा केल्याचे संजय पाटील यांच्या जबाबात उघड झालं आहे.
राजू भुजबळ आणि संजय पाटील 4 मार्च 2021 रोजी अनिल देशमुख यांच्या ज्ञानेश्वर बंगल्यावर त्यांना भेटले असल्याचा उल्लेख परमबीर सिंह यांनी केला आहे. मात्र या तिघांची एकत्र बैठक झाली नसल्याचं या दोन्ही अधिकार्यांनी जबाब दिला आहे. 4 मार्च रोजी आपण अधिवेशनाच्या ब्रिफींगसाठी गृहमंत्र्यांना ज्ञानेश्वरीवर भेटलो, तेव्हा संजय पाटील तिथे नव्हते, मी बाहेर पडताना दारात मला संजय पाटील भेटल्याचा भुजबळ यांनी सांगितलं. या जबाबमुळे माजी पोलीसआयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रावरील दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.