(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काश्मीरमध्ये सुरु असलेल्या पलायन, हत्यांवर 'कश्मीर फाईल्स 2' चित्रपट बनवावा : संजय राऊत
कलम 370 हटवल्यानंतरही काश्मीरमधल्या परिस्थितीत अजिबात बदल झालेला नाही. काश्मिरी पंडितांच्या नशिबी पलायनच आलं, असं संजय राऊत म्हणाले.
मुंबई : "काश्मीरमध्ये जे पलायन सुरु आहे, हत्या सुरु आहेत त्यावर 'कश्मीर फाईल्स 2' अशाप्रकारचा चित्रपट निर्माण करावा आणि या 'कश्मीर फाईल्स 2' ला जबाबदार कोण आहे ते लोकांसमोर दाखवावं, असं वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच कलम 370 हटवल्यानंतरही काश्मीरमधल्या परिस्थितीत अजिबात बदल झालेला नाही. काश्मिरी पंडितांच्या नशिबी पलायनच आलं, असं संजय राऊत म्हणाले. मुंबईत माध्यमांशी संवात साधताना संजय राऊत यांनी काश्मीरमधील हत्यासत्र, राज्यासभा-विधानपरिषद निवडणूक याबाबत भाष्य केलं.
पंतप्रधान, गृहमंत्री भाजपचे असूनही काश्मीरमध्ये हत्या सुरुच : संजय राऊत
काश्मीरची परिस्थिती फारच गंभीर आहे. गृहमंत्र्यांनी जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालांसोबत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. सरकार प्रयत्न करत आहे पण आज पुन्हा तिच परिस्थिती निर्माण झाली आहे जी 1990 मध्ये होती. तुम्ही काश्मिरी पंडितांच्या घरवापसीबद्दल बोलला होता आणि त्यावर मतं सुद्धा मिळवली होती. पण कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमधील जनतेच्या परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. आजही दोन जणांच्या हत्या झाल्या. काश्मिरी पंडितांना शोधून मारलं जात आहे. सरकारकडून सुरक्षेची कोणतीही व्यवस्था केली जात नाही. नागरिकांचं पलायन आणि स्थलांतर सुरु आहे. हे जर दुसऱ्या पक्षाच्या राज्यात झालं असतं तर भाजपने हिंदुत्त्वच्या नावावर, काश्मिरी पंडितांच्या नावावर संपूर्ण देशात कांगावा केला असता. पण गृहमंत्री, पंतप्रधान आणि जम्मू काश्मीरमध्ये भाजपचं प्रशासन असूनही काश्मिरी पंडित प्राण गमावत आहेत, किंवा पलायन करत आहेत.
काश्मिरी पंडितांच्या नशिबी पलायनच : राऊत
या देशातील अनेक राज्यामध्ये विशेषत: जम्मू काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित, तिथला नागरिक हिंदू किंवा मुसलमान असो हा अत्यंत भीतीखाली आयुष्य जगत आहेत. घरात, कार्यालयात घुसून त्यांना मारलं जात आहे. कलम 370 हटवल्यानंतर सुद्धा तिथल्या परिस्थितीत अजिबात बदल झालेला नाही. कश्मीर फाईल्स चित्रपटाचं प्रमोशन केलं. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या कृपेने निर्मात्याने 400-500 रुपये कमावले. पण काश्मिरी पंडितांच्या नशिबी पलायनच आलं. खरं म्हणजे पलायन सुरु आहे, हत्या सुरु आहेत त्यावर कश्मीर फाईल्स 2 अशाप्रकारचा चित्रपट निर्माण करावा आणि या कश्मीर फाईल्स 2 ला जबाबदार कोण आहे ते लोकांसमोर दाखवावं.
सरसंघचालकांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत
प्रत्येक मशिदीत शिवलिंग का पाहावे? भांडण का वाढवायचे? ज्ञानवापी मशिदीवरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी वक्तव्य केलं. याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, "मंदिरांसाठी संघर्ष करण्यापेक्षा काश्मिरी पंडितांचे प्राण कसे वाचवता येतील हे पाहणं गरजेचं आहे. मोहन भागवत बरोबर बोलले, मी त्यांच्या भूमिकेचं स्वागत करतो. हा रोजचा वाद बंद व्हावा. नाहीतर देश देश राहणार नाही. मंदिरांखाली शिवलिंग शोधण्यापेक्षा काश्मिरी पंडितांच्या प्राणांची, काश्मीरची रक्षा कशी करावी याचा विचार करावा.
'घोडेबाजार करण्यासाठी पैसा कुठून येतो याचा तपास ईडीने करावा'
हे अत्यंत चांगलं आहे. देवेंद्र फडणवीस मॅच्युअर्ड नेते आहेत. आधीच महाराष्ट्राचं राजकीय वातावरण अतिशय प्रदूषित आणि गढूळ झालं आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने हे वातावरण अधिक बिघडण्याची शक्यता सगळ्यांना वाटते. घोडेबाजार नावाचा शब्द आहे तो अत्यंत वाईट पद्धतीने महाराष्ट्रात सुरु झाल्याचं दिसतं. राजकारणात निवडणुकीसाठी जो पैसा आणला जातो तो कुठून येतो याचा तपास ईडीने करायला हवा. आमदार विकत घेण्यासाठी, त्यांना प्रलोभणं दाखवणारे कोण आहेत. कोटी-कोटी रुपयांचे जे आकडे ऐकतो, त्यामागचे सूत्रधार कोण आहेत, हे महाराष्ट्राच्या जनतेने विचार करणं, केंद्रीय तपास यंत्रणांनी त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अर्थात सर्वपक्षीय शिष्टमंडळ महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्रातील वातावरण उत्तम राहावं यासाठी जर विरोधी पक्षनेत्यांना भेटत असेल आणि त्यातून महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेसाठी चांगला मार्ग निघत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे.