वांगणीतील 99 टक्के फुफ्फुस संसर्ग झालेल्या रुग्णाला दोन दिवसात बरे केल्याचा दावा, डॉक्टरवर गुन्हा दाखल
डॉ. गुप्ता यांनी कोरोनाबाधित रुग्णाला एका दिवसात बरं करण्याचा दावा करत समाज माध्यमावर एक व्हिडीओ व्हायरल केला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या क्लिनिकमध्ये रुग्णांची गर्दी होत होती.
कल्याण : अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर नजीक असलेल्या वांगणी येथे शिला क्लिनिक ह्या खाजगी दवाखान्याच्या डॉ. उमाशंकर गुप्ता आणि त्याच्या महिला सहकारी डॉक्टरवर बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. गुप्ता यांनी कोरोनाबाधित रुग्णाला एका दिवसात बरं करण्याचा दावा करत समाज माध्यमावर एक व्हिडीओ व्हायरल केला होता.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या क्लिनिकमध्ये रुग्णांची गर्दी होत होती. त्यांच्या उपचार पद्धतीवर तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. हा सर्व प्रकार एबीपी माझाने प्रकाश झोतात आणला होता. अखेर या संपूर्ण प्रकाराची दखल आरोग्य विभागाने घेतलीय. डॉ गुप्ता यांनी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा परिषद आणि आरोग्य विभाग ठाणे यांची कोणतीही परवानगी नसताना वांगणी येथे आपले क्लिनीक थाटले होते. तसेच कोरोना काळात कोणतेही नियम न पाळता, मास्क न लावता, सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेत नसल्याचा ठपका ठेवत अखेर ह्या डॉक्टरवर बदलापूर ग्रामीण पोलिसांनी अंबरनाथचे डॉ. सुनील बनसोडे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप त्यांना अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.