(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नववी आणि अकरावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याची आणखी एक संधी मिळणार
नववी आणि अकरावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणार तोंडी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.
मुंबई : कोरोनाच्या संकटात आता नववी आणि अकरावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्याबाबत नेमकं करायचं काय? याबाबत शाळा आणि महाविद्यालयामध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, शिक्षण विभागाने आज शासन निर्णय जारी करून हा संभ्रम दूर करत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना एक मोठा दिलासा देत तोंडी परीक्षेची संधी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा नववी आणि अकरावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा शक्य नाही. दरम्यान या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून आणखी एक संधी शिक्षण विभागाकडून देण्यात येत आहे. या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची 7 ऑगस्ट 2020 पर्यंत प्रत्यक्ष शाळेत बोलावून किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे तोंडी परीक्षा घेण्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या नंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना यंदाच्या दहावी व बारावीच्या वर्गात प्रवेश देण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या आहेत.
नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना यंदा सत्राच्या गुणांच्या सरासरीवरून उत्तीर्ण करण्यात यावे असा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला. मात्र, यामध्ये सुद्धा अकरावी व नववीचे अनेक विद्यार्थी यंदा अनुत्तीर्ण झाल्याचे समोर झाले. त्यातच 2018 प्रमाणे होणारी फेरपरीक्षा ही यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अनेक पालकांनी आणि शिक्षक संघटनांनी याचा निषेध करत विद्यार्थ्यांना सरसकट पास करून दहावी व बारावीच्या वर्गात पाठविण्याची विनंती वारंवार करण्यात येत होती. एकीकडे शिक्षण विभागाकडून फेरपरीक्षेसंदर्भात कोणताही निर्णय नाही तर दुसरीकडे पालक आणि शिक्षक संघटनांची विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची मागणी यामुळे शैक्षणिक संस्थांसमोर ही मोठा पेच उभा राहिला होता. या सगळ्या परिस्थितीचा विचार करत आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये हे लक्षात घेत शिक्षण विभागाने 7 ऑगस्टपर्यंत शाळांना विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेण्याची सूचना केली आहे.
मुंबई विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरु, आजपासून ऑनलाईन नाव नोंदणी, 24 जुलैपासून अर्जविक्री
काही पालकांनी नववी व अकरावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या बाबतीत निर्णय घ्यावा यासाठी ऑनलाईन आंदोलनही केले. पदवीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी सरकार धडपडत आहेत. आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला आहे. मग नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांची काय चूक आहे त्यांना वेगळा न्याय का? असा प्रश्न राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केला आणि या आंदोलनाचा पाठपुरावा केला.
मात्र, यामध्ये 9 वी आणि 11 वी नापास विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा ती पण तोंडी घेण्यासाठी शाळेत बोलवणे म्हणजे कोरोनाला आमंत्रण देण्यासारखे आहे. आज मुंबईतील अनेक शाळा कंटेनमेंट झोनमध्ये आहेत. दुसरा उपाय व्हिडीओ कॉन्फरन्सने तर अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाहीत. काहींकडे नेट पॅक नाही. त्यापेक्षा 9 वी नापास मुलांना थेट दहावीला प्रवेश देऊन प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यावर त्यांच्याकडून अभ्यास करून घेता येईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेत त्यांना बोलावू नये, असे मत मुंबई भाजप प्रदेश शिक्षक आघाडीचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी व्यक्त केले आहे.
Mumbai University | मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात