आदित्य ठाकरेंना रोखण्यासाठी शिंदेंची युवा सेना मैदानात, 24 फेब्रुवारीला ठाण्यात होणार युवासेनेचं शिबीर
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे मागील काही दिवसांपासून स्वतः मुंबईच्या शाखांना भेटी देऊन पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशात आता शिंदेंची युवा सेना देखील मैदानात उतरणार आहे.
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेना (ShivSena) कामाला लागली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना दोन्हीचे मुंबईवर विशेष लक्ष असणार आहे. त्यामुळे शिंदेंची युवा सेना आता आदित्य ठाकरेंच्या (Aaditya Thackeray) विरोधात रिंगणात उतरणार आहे. मुंबईत (Mumbai) ठाकरे गटाची ताकद पाहता आणि त्यातल्या त्यात युवा मतदारांना डोळ्यासमोर ठेवून शिंदेंची युवा सेना मैदानात उतरत असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश सरनाईक (Purvesh Sarnaik) यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचं शिबीर आयोजित करण्यात आले आहे. आदित्य ठाकरेंना रोखण्यासाठी शिंदे गटाच्या शिवसेनेची ही नवी रणनीती असल्याचे बोलले जात आहे.
आदित्य ठाकरे मागील काही दिवसांपासून स्वतः मुंबईच्या शाखांना भेटी देऊन पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यानिमित्ताने ठाकरे गटाची युवा सेना पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात सक्रीय होतांना पाहायला मिळत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत देखील याचे परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता असल्याने आता शिंदे गटाची युवा सेना देखील सक्रीय होतांना दिसत आहे. आदित्य ठाकरे यांना रोखण्यासाठी शिंदेंच्या युवा सेना प्रयत्न करतांना पाहायला मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचं शिबीर आयोजत करण्यात आले आहे. येत्या 24 फेब्रुवारीला सायंकाळी 4 वाजता ठाण्यात हे शिबिर होणार असून, यासाठी राज्यभरातील सर्व युवा कार्यकर्त्यांना बोलवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे युवा सैनिकांना खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संबोधित करणार आहे.
उद्धव ठाकरे राज्याच्या अन् आदित्य ठाकरे मुंबईच्या दौऱ्यावर...
एकीकडे उद्धव ठाकरे राज्याच्या वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाचा दौर करत आहे, तर दुसरीकडे आदित्य ठाकरे मुंबईतील वेगवेगळ्या शाखांना भेटी देऊन शिवसैनिकांशी संवाद साधत आहे. विशेष म्हणजे रविवारी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात धडक देत शिवसैनिकांची भेटीगाठी घेतल्या. तसेच, “शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना!” हे नातं कुणीही कधीच पुसू शकणार नाही. निष्ठावंत शिवसैनकांच्या बळावर आजही ताकदीने ठाण्यात शिवसेनेचा बुरुज उभा आहे. ही जनता सोबत असताना माझ्या बुरुजाला कुणीही सुरुंग लावू शकत नाही, असे आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत म्हटले आहे. तर, आदित्य ठाकरे यांनी ठाण्यातील आनंदनगर शाखेला भेट दिली. यावेळी ठाण्यातील दुर्गा चौक मानपाडा येथे शिवसैनिकांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच, ठाण्यातील जिजामाता नगर येथील शाखेस भेट देऊन उपस्थित शिवसैनिकांसोबत त्यांनी संवाद साधला. तसेच चंदनवाडी येथील शाखेस देखील त्यांनी भेट दिली होती.
इतर महत्वाच्या बातम्या :