Lalit Patil Arrested: मला ससूनमधून पळवण्यात कोणाकोणाचा हात सगळं सांगणार; जेरबंद ललित पाटीलचा खळबळजनक गौप्यस्फोट
Lalit Patil Arrested: साकीनाका पोलीस स्थानकातून वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयाच्या दिशेनं जात असताना, मी पत्रकारांशी लवकरच बोलीन, असं ललित पाटील म्हणाला.
Lalit Patil Arrested: ससून रुग्णालयातून पोलिसांच्या (Sasoon Hospital Drug Racket) हातावर तुरी देऊन पळालेला ड्रग माफिया ललित पाटीलला (Lalit Patil) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली असून त्याला अंधेरी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. साकीनाका पोलीस स्थानकातून वैद्यकीय तपासणीसाठी जात असताना जेरबंद ललित पाटील माझाच्या कॅमेऱ्यात कैद झाला. साकीनाका पोलीस स्थानकातून वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयाच्या दिशेनं जात असताना, मी पत्रकारांशी लवकरच बोलीन, असं ललित पाटील म्हणाला. त्यानंतर अंधेरी न्यायालयात पोहोचल्यानंतर मी ससून रुग्णालयातून पळालो नाही, मला पळवलं गेलं, यामध्ये कोणाकोणाचा हात आहे मी सगळं सांगणार, असं खळबळजनक गौप्यस्फोट ड्रग माफिया ललित पाटीलनं केला आहे.
काय म्हणाला ललित पाटील?
ड्रग माफिया ललित पाटील म्हणाला की, मी लवकरच माध्यमांशी संवाद साधणार आहे. मी ससून रुग्णालयातून पळालो नाही, तर मला तिथून पळवण्यात आलं. यामध्ये कोणाकोणाचा हात आहे, हे मी सगळं सांगणार आहे."
नाशिक, पुणे आणि मुंबई पोलीस मागावर असताना ललितचा नाशकात मुक्तसंचार
ससुन रुग्णालयातून पळ काढल्यानंतर ललित पाटील अनेक दिवस नाशिकमध्येच होता. नाशिक पोलीस, पुणे पोलीस तसेच मुंबई पोलीस मागावर असताना देखील ललित पाटील नाशिकमध्येच कसा? त्याला कोणाचा राजकीय पाठींबा होता का? तपास यंत्रणांच्या शोध कार्याला गती येताच ललित पाटीलनं नाशिकमधून पळ काढला. त्यानंतर इंदोरला गेला, तिथून तो सूरतमध्ये गेला आणि पुन्हा नाशिक धुळे औरंगाबाद करत कर्नाटकात प्रवेश केला. बंगळूरवरून चेन्नईला जात असताना साकीनाका पोलिसांनी ललित पाटीलला अटक केली. चेन्नईवरुन ललित श्रीलंकेला जाणार होता, अशी माहिती मिळत आहे.
सुषमा अंधारेंचा आरोप नेमका काय होता?
ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. ससून रुग्णालयात त्याच्यावरल उपचार सुरू असतानाच त्यानं तिथून पळ काढला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. याप्रकरणानंतर राजकीय वर्तुळातही खळबळ माजली होती. त्यासाठी कारणीभूत ठरलं ते, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचं वक्तव्य. ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरणात मंत्री दादा भुसे यांच्यासोबतच अजून दोन मंत्र्यांचा समावेश आहे, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. त्यासोबतच या दोन्ही मंत्र्यांची नावं लवकरच पुढे आणू, असंही त्या म्हणाल्या होत्या.
अंधारेंच्या आरोपांवर काय म्हणालेले दादा भुसे (Dada Bhuse)?
ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरणात शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खळबळजनक आरोप केले होते. त्यावर बोलताना मंत्री दादा भुसे यांनी आपली बाजू स्पष्ट केली होती. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी सुषमा अंधारे यांनी ऐकीव माहितीच्या आधारे आपल्यावर आरोप केले आहेत, त्यामध्ये तथ्य नसल्याचा दावा राज्याचे मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केला होता. तसेच, चौकशीतून सत्य बाहेर येईल, आरोप सिद्ध न झाल्यास अंधारे यांच्यावर मानहानीचा दावा करणार असल्याचंही दादा भुसे म्हणाले होते.
सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मंत्री दादा भुसे म्हणालेले की, "सुषमा अंधारे यांनी ऐकीव माहितीवर हा आरोप केला आहे. सुषमा अंधारे यांनी ऐकीव माहितीवर आरोप केले. त्यांच्याकडे पुरावे किंवा ठोस माहिती नाही, सुषमा अंधारेंनी माहिती घेऊन आरोप करावेत. माझे कॉल रेकॉर्ड चेक करावेत, त्यासंबंधित सर्वांचे कॉल रेकॉर्डे चेक करावेत. असे आरोप करणे म्हणजे एखाद्याला आयुष्यातून उठवण्यासारखं आहे. चौकशीमध्ये सत्य समोर येईल आणि नंतर आरोप करणाऱ्यांना माफी मागावी लागेल. माझ्यावर करण्यात आलेले आरोप सिद्ध न झाल्यास मानहानीचा दावा दाखल करणार."
प्रकरण नेमकं काय?
पुण्यातील ससून रुग्णालयातील ड्रग्ज रॅकेट प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील हा ससून रुग्णालयामध्येच उपचार घेत होता. काही दिवसांपूर्वी तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेलेला. त्यानंतर या घटनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. सर्वात आधी पुण्याचे आमदार रविंद्र धनगेकर यांनी शिंदे गटाच्या एका मंत्र्यांनं ललित पाटीलला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट मंत्री दादा भुसे यांच्यावरच आरोप करत त्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करण्याची मागणी केली होती.
ललित पाटीलच्या भावाला अयोध्येतून अटक
ड्रग माफिया ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडेला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशातील आयोध्येजवळून ताब्यात घेतलं आहे. ललित पाटील ससून रुग्णालयातून निसटल्यानंतर भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडेदेखील पसार झाले होते. भूषण पाटील हा केमिकल इंजिनियर आहे. त्याने मेफेड्रॉन तयार करण्याचं प्रशिक्षण घेतल्यावर तो नाशिक एमआयडीसीमध्ये मेफेड्रॉन तयार करण्याचं काम करत होता. भूषण पाटील मेफेड्रॉन तयार करायचा, अभिषेक बलकवडे त्याची वाहतूक करायचा तर ललित पाटील प्रत्यक्ष डील करायचा.
दादा भुसे आणि शंभुराजे देसाई यांची नार्को टेस्ट करा : सुषमा अंधारे
ललित पाटीलला अटक केल्यानंतर याप्रकरणात दादा भुसेंचं नाव घेणाऱ्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया समोर आली आहे. ललित पाटीलला पळवण्यात राजकीय नेते सहभागी आहेत. ललित पाटील सोबत दादा भुसे आणि शंभुराजे देसाई यांची नार्को टेस्ट करा,अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे. ललित पाटील प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी झाली पाहिजे. दादा भुसे, शंभुराज देसाई, ससूनचे डीन, त्याला पळून जाण्यास मदत करणारे डॉक्टर यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. ससूनमधून पळून जाऊन तो नाशिकमधे काही दिवस होता. मोठी रक्कम आणि दागिने घेऊन तो नाशिकमध्ये कसा राहिला याची माहिती देवेंद्र फडणविसांनी द्यावी लागेल, असे अंधारे म्हणाल्या आहेत.