कोरोनामुळे यंदा महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी करु नका : रामदास आठवले
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा धम्मचक्रप्रवर्तन दिनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर आणि महापरिनिर्वाण दिनी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करु नका. या दोन दिवशी बाबासाहेबांना घरातूनच अभिवादन करा, असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे.
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा धम्मचक्रप्रवर्तन दिनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर आणि महापरिनिर्वाण दिनी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करु नये असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जसे सण साधेपणाने साजरे केले तसंच या दोन दिवशी बाबासाहेबांना घरातूनच अभिवादन करा, असं आठवले म्हणाले.
दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीवर गर्दी करु नका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अर्थात 6 डिसेंबर रोजी लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येतात. पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा लोकांनी चैत्यभूमीवर येऊ नये, गर्दी करु नये असे आवाहन आम्ही करत आहोत. चैत्यभूमीचं ऑनलाईन दर्शन देण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, असं रामदास आठवले यांनी सांगितलं.
तसंच 25 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी धम्मचक्रप्रवर्तन दिनी नागपुरातील दीक्षाभूमीवरही 4 ते 5 लाख लोक जमतात. तिथेही लोकांनी येऊ नये अशी विनंती मी करत आहे. जसे इतर सण अतिशय साधेपणाने साजरे केले तसेच या दोन दिवशी लोकांनी आपल्या घरुनच बाबासाहेबांना अभिवादन करावं, असं आठवले म्हणाले.
बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम 36 महिन्यात पूर्ण करण्याचं अधिकाऱ्यांचं आश्वासन इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम 36 महिन्यात पूर्ण करण्याचं आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याचं आठवले यांनी सांगितलं. ते म्हणाले की, "दादरच्या इंदू मिल इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरकाबाबत आज मी एमएमआरडीए, शापूरजी पालनजी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. 36 महिन्यात स्मारकाचे काम पूर्ण करु असे आश्वासन त्यांनी दिलं आहे. सोबतच मूर्तिकार राम सुतार यांच्यासोबत मी चर्चा केली आहे. त्यांनी बाबासाहेबांचं स्मारक बनवण्याबाबत तयारी दर्शवली असल्याचंही आठवलेंनी सांगितलं. तसेच चैत्यभूमीच्या स्तूपाची डागडुजी करण्यासंदर्भात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. हे स्तूप जीर्ण अवस्थेत असून कधीही पडण्याची भीती आहे, असं आठवले म्हणाले.
हाथरस प्रकरणावर आठवले काय म्हणाले? उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणावरुन देशात संतापाचं वातावरण आहे. याबाबत रामदास आठवले म्हणाले की, "हाथरसमधील पीडित कुटुंबियांची मी भेट घेऊन आलो. आमच्या पक्षाकडून त्यांना पाच लाखांची मदत केली आहे. तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांना पुरेशी संरक्षण देण्याबाबत सांगितले आहे.
राहुल गांधींनी कुटुंबियांना भेटलं पाहिजे, फक्त राजकारणासाठी त्याठिकाणी जाऊ नये, असा टोलाही आठवलेंनी लगावला. तसंच राजस्थानमध्ये बलात्कार झाला तिथे राहुल गांधी का गेले नाहीत? अशोक गेहलोतांना राहुल गांधी जाब का विचारत नाहीत? असा सवालही त्यांनी विचारला.
'संजय राऊत यांनी मला दलितांबद्दल शिकवू नये' हाथरस प्रकरणावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रामदास आठवले यांच्यावर टीका केली. याविषयी आठवले म्हणाले की, "संजय राऊत विचारत आहेत की हाथरसमध्ये बलात्कार झाला तेव्हा मी कुठे होतो, मी एका नटीच्या समर्थनात उतरलो. पण मी कंगनाला मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत केली, संरक्षण दिले. मी पँथरमधून तयार झालेला कार्यकर्ता आहे. संजय राऊत यांनी मला दलितांबद्दल शिकवू नये. संजय राऊत पायल घोषवर झालेल्या अत्याचारावर का बोलत नाहीत? मी नटींच्या गराड्यात नाही तर कायम कार्यकर्त्यांच्या गर्दीत असतो हे संजय राऊत यांना माहित नसावं."
एकनाथ खडसेंनी आरपीआयमध्ये यावं : आठवले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र आता त्यांना तिथे जाऊन काही फायदा नाही. मंत्रिमंडळ आता फुल्ल झालं आहे. त्यापेक्षा त्यांनी आरपीआयमध्ये यावं. त्यांना सत्तेत वाटा देण्याचं काम आम्ही करु. त्यांना सत्तेत यायचं असेल तर त्यांनी आताचं सरकार घालवले पाहिजे, असं आठवले म्हणाले.
मला गांभीर्याने घेणारे अनेक लोक, आठवलेंचं शरद पवारांना उत्तर शरद पवारांनी एनडीएमध्ये यावं, असं आवाहन रामदास आठवले यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यावेळी आठवलेंना कोणीही गांभीर्याने घेत नाही, असं शरद पवार म्हणाले होते. यावरही आठवलेंनी भाष्य केलं. "मला गांभीर्यानं घेणारे अनेक लोक आहेत. माझं ऐकणारा समाजात मोठा वर्ग आहे. ज्यांना माझं बोलणं पटत नसेल त्यांना मला गांभीर्यानं घ्यायचं नसेल. त्यावर माझा नाईलाज आहे. मला जे वाटतं, जे पटतं ते मी बोलत राहणार."
Ramdas Athavale PC | 6 डिसेंबरला चैत्यभूमीवर गर्दी करु नका : रामदास आठवले