Kalyan News : कल्याणच्या कुंभारवाड्यात दिवाळीची लगबग सुरू, मात्र पावसामुळं व्यापारी चिंतेत
Kalyan Kumbharwada News : परतीच्या पावसाचा कल्याण कुंभारवाड्यातील व्यापाऱ्यांना फटका. पावसामुळं तयार केलेल्या मातीच्या पणत्या सुकेना.
Diwali 2022 : गेली दोन वर्ष कोविडमुळे (Covid-19) झालेल्या व्यवसायाचं नुकसान अद्याप भरूनही निघालेलं नाही. यंदा सर्वच सण आणि उत्सव कोणत्याही निर्बंधाविना साजरे होत आहेत. दहिहंडी, गणेशोत्सव, नवारात्रोत्सवानंतर आता देशभरात दिवाळी धुमधडाक्यात साजरी केली जाणार आहे. अशातच घराघरांत दिवाळीची (Diwali News) लगबग सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. एवढंच नाहीतर बाजारपेठांमध्येही दिवाळीची लगबग दिसत आहे. कल्याणचा कुंभारवाडा (Kalyan Kumbharwada) ही दिवाळीसाठी सज्ज झाला आहे.
सध्या ऑक्टोबर महिना उजाडला असून दिवाळीची लगबग सुरु झाली आहे. मात्र ऑक्टोबरचा अर्धा महिना उजाडला तरी अद्याप पाऊस काही जाण्याचं नाव घेत नसल्यानं दिसत आहे. त्यामुळे कल्याणच्या कुंभार वाड्यातील (Kumbharwada) व्यावसायिक चिंतेत पडले आहेत.
गेल्यावर्षी कोरोनामुळे (Coronavirus) दिवाळी सणांवर निर्बंध होते. त्यामुळे त्याचा फटका कल्याणमधील कुंभारवाड्याला मोठ्या प्रमाणावर बसला होता. यंदा मात्र कोरोनाचे सावट दूर झालेलं आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावात मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. दिवाळीची लगबग सुरु झाली आहे. कल्याणच्या कुंभारवाड्यातही अशीच लगबग सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. कारागीर उत्साहानं कामाला लागलेले आहेत. दिवाळीमध्ये वापरात येणाऱ्या पणत्या, दिवे आणि इतर अनेक मातीच्या वस्तू, कल्याणमधील कुंभारवाड्यात तयार केल्या जातात. यामध्ये जाळीचे आकर्षक दिवे, पणत्या आदींचा समावेश आहे.
आधी कोरोनाचं सावट आणि पाऊस यांचा फटका कल्याणच्या कुंभार समाजाला बसला आहे. मात्र यंदा आधी दहीहंडी, मग गणपती आणि त्यानंतर नवरात्र हे सण निर्बंधांविना अत्यंत जल्लोषात साजरे झाले. त्यामुळे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाच्या काळात चांगल्या व्यवसायाची आशा निर्माण झाली आहे. मात्र हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिरावून घेतला जातो की, काय या विवंचनेत कुंभार समाज अस्वस्थ झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत पडत असणाऱ्या पावसामुळे तयार केलेल्या मातीच्या पणत्या सुकतच नाहीत. त्यामुळे त्या रंगवण्यासाठी आवश्यक असणारा वेळ दिवसागणिक कमी होऊ लागला आहे. यावर्षी ग्राहकांची पणत्यांना चांगली मागणी आहे. परंतु लांबलेला पाऊस आपल्या व्यवसायावर पाणी फिरवतो की, काय या भितीनं कुंभार समाज चिंतेत आहे.