Asia Cup : UAE चा ओमानवर विजय, भारत सुपर फोरमध्ये दाखल, अ गटातील समीकरण बदललं, पाकिस्तानवर स्पर्धेतून बाहेर जाण्याचं संकट
Asia Cup 2025 : आशिया कपमधील अ गटातील समीकरण बदललं आहे. यूएईनं ओमानवर विजय मिळवल्यानं अ गटातील रंगत वाढली आहे. पाकिस्तानचा संघ स्पर्धेबाहेर जाण्याचं संकट आलंय.

दुबई : आशिया कपमध्ये आज संयुक्त अरब अमिरात म्हणजेच यूएईनं धमाकेदार कामगिरी करत ओमानवर मोठा विजय मिळवला आहे. यूएईनं ओमानवर विजय मिळवल्यानं भारत अधिकृतपणे सुपर 4 मध्ये दाखल झाला आहे. भारताकडून पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर यूएईनं दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. यूएईच्या विजयानं अ गटातील समीकरण बदललं आहे. पाकिस्तानवर आशिया कपमधून बाहेर जाण्याचं संकट निर्माण झालं आहे.
यूएईचा कॅप्टन मोहम्मद वसीम आणि अलिशान शराफू यांनी केलेल्या अर्धशतकांमुळं टीमनं 5 विकेटवर 172 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना ओमानचा संघ 130 धावांवर बाद झाला. ओमाननं टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
युएईचा कॅप्टन मोहम्मद वसीम आणि अलिशान शराफू यांनी दमदार फलंदाजी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 88 धावा केल्या. अलिशान शराफूनं 38 बॉलमध्ये 51 धावा तर मोहम्मद वसीमनं 54 बॉलमध्ये 69 धावा केल्या. मोहम्मद जोहेब आणि हर्षित कौशिकनं हातभार लावल्यानं यूएईचा संघ 5 बाद 172 धावा करु शकला.
ओमानच्या संघावर यूएईनं सुरुवातीपासून दबाव कायम ठेवला. यामुळं ओमानचा निम्मा संघ 50 धावा करु शकला. जुनैद सिद्दीकीच्या माऱ्यापुढं ओमानची फलंदाजी टिकाव धरु शकली नाही. 4 ओव्हरमध्ये 23 धावा देत त्यानं 4 विकेट घेतल्या. हैदर अलीनं 2 विकेट घेतल्या. ओमानचा संघ 18.4 ओव्हरमध्ये 130 धावांवर बाद झाला.
पाकिस्तानचा संघ संकटात
यूएईनं ओमानवर विजय मिळवत 2 गुण मिळवले आहेत. आशिया कपमधील आव्हान यूएईनं कायम ठेवलं आहे. अ गटात भारत आता 4 गुण मिळवत पहिल्या स्थानावर आहे. पाकिस्तान दुसऱ्या तर यूएई तिसऱ्या स्थानावर आहे. आता पाकिस्तान आणि यूएई यांच्यात लढत होईल. या लढतीतील विजयी संघ अ गटातून सुपर फोरमध्ये दाखल होईल. यूएईनं विजय मिळवल्यास पाकिस्तानचा संघ आशिया कप स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतो. अ गटातून भारत सुपर 4 मध्ये दाखल झाला आहे.
आशिया कपमधील उर्वरित सामन्याचं वेळापत्रक
16 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
17 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध यूएई
18 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
19 सप्टेंबर – भारत विरुद्ध ओमान
सुपर-4 आणि अंतिम सामना
20 सप्टेंबर – बी1 विरुद्ध बी2
21 सप्टेंबर – ए1 विरुद्ध ए2
23 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी1
24 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी2
25 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी2
26 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी1
28 सप्टेंबर – अंतिम सामना
























