Ramdas Kadam and Gajanan Kirtikar : ऐन दिवाळीत शिंदे गटात शिमगा; गजाभाऊ, तुमच्या रक्तात भेसळ, रामदास कदम-गजानन कीर्तीकर वादाने टोक गाठलं!
Shiv Sena Ramdas Kadam and Gajanan Kirtikar : शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर आणि नेते रामदास कदम यांच्यातील वाकयुद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. कदम यांनी पुन्हा एकदा कीर्तीकरांवर बोचरी टीका केली आहे.
मुंबई : शिवसेना शिंदे गटात (Shiv Sena Shinde Faction) आरोप-प्रत्यारोपाचे फटाके वाजू लागले आहेत. शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी पुन्हा एकदा त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीकास्त्र सोडले आहे. गजाभाऊंना आता डॉक्टरांचीच गरज असल्याचे वक्तव्य रामदास कदम यांनी केले आहे.
मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून शिवसेना शिंदे गटात वाद असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर आणि नेते रामदास कदम यांच्यातील वाकयुद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. अशातच रामदास कदम यांच्या विरोधात पत्र काढून गजानन कीर्तीकर यांनी रामदास कदम यांच्या गद्दारीचे पाढेच वाचले आहेत. यावर आता रामदास कदम यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून किर्तीकर यांचे वय झाले असून त्यांना आता चांगल्या उपचाराची गरज असल्याचे म्हटले आहे.
गजाभाऊंच्या रक्तात भेसळ...
रामदास कदम यांनी म्हटले की, खरंतर किर्तीकर पक्षासोबत गद्दारी करत आहेत. गोरेगाव येथील कार्यालयात वडिलांनी मुलगा एकाच कार्यालयात बसत आहेत. आपला खासदारकीचा निधी मुलाला विकास कामे करण्यासाठी देत आहेत. कदम यांना कसं बदनाम करायचा हे आमच्या पक्षातील एक ज्येष्ठ नेता करत असल्याचे कदम यांनी म्हटले. कीर्तीकर यांच्या रक्तात भेसळ झाली असल्याची बोचरी टीका त्यांनी केली.
गजाभाऊंना डॉक्टरांची गरज...
रामदास कदम यांनी म्हटले की, गजाभाऊंचे वय झालेय त्यांना डॉक्टरांची गरज आहे. पक्षाच्या नेत्याविरुद्ध त्यांना पक्ष प्रमुखांसोबत चर्चा करणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी थेट निवेदन जारी करत बेछुट आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले की 1990 मध्ये पाडण्याचा आदेश दिला. त्यावेळी मी कांदिवलीमध्ये एक शाखाप्रमुख होतो. त्यावेळी मला शिवसेनाप्रमुखांनी खेड मतदारसंघातून निवडणुकीसाठी उमेदवारी दिली. त्यावेळी केशव भोसले यांच्यासोबत माझी लढत होती. त्यांना दाऊदचा त्यांना पाठिंबा होता. त्यावेळी दाऊद देशातून बाहेर पळून गेला नव्हता. त्यामुळे माझी लढत दाऊद सोबत होती. माझा संघर्ष तिकडं असताना गजाभाऊंना मालाडमध्ये कशासाठी पाडायला येऊ, असा उलट प्रश्न कदम यांनी केला. गजानन कीर्तीकरांना आता थेट 33 वर्षांनंतर याची आठवण का आली असा सवालही कदम यांनी उपस्थित केला.
रामदास कदम यांनी गजानन कीर्तीकर यांनी केलेले आरोप फेटाळताना म्हटले की, अनंत गीतेंनी मला उद्धव ठाकरेंच्या आदेशाने गुहागरमधून पाडलं. त्यामुळे ज्या गीतेंनी मला पाडलं त्याचा प्रचार करणार नाही असे म्हटले. तेव्हा मला राज्यात इतरत्र पाठवण्यात आले. गद्दारी मी नाही करत तुम्ही करत आहात. तुमचं पितळ उघड पडलं म्हणून तुमचं पित्त खवळलं असल्याची बोचरी टीका कदम यांनी केली.
कीर्तीकर-कदम वाद काय?
गजानन कीर्तीकर हे मुंबईतील उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघाचे खासदार आहेत. रामदास कदम यांनी या मतदारसंघावर मुलासाठी दावा केला आहे. गजानन कीर्तीकर यांचे वय झाले आहे. त्यामुळे त्यांनी या मतदारसंघातून लढू नये. कीर्तीकर हे पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू शकतात, असेही त्यांनी म्हटले होते. गजानन कीर्तीकर यांचा मुलगा अमोल कीर्तीकर हे सध्या ठाकरे गटात आहेत. ठाकरे गटाकडून संभाव्यत: तेच उमेदवार असणार आहेत. तर, रामदास कदम सिद्धेश कदमसाठी आग्रही आहेत. गजानन कीर्तीकर यांनी रामदास कदम यांच्या टीकेला उत्तर देताना प्रत्यारोप केले होते. गद्दार रामदास कदमांच्या तोंडी दुसऱ्यांच्या गद्दारीची भाषा हास्यास्पद आहे, अशी टीका गजानन कीर्तिकरांनी केली होती.