खडसेंवर गुन्हा माझ्यामुळे नाही तर न्यायालयाच्या आदेशानं दाखल झाला, फडणवीसांचं उत्तर
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन आरोप केल्यानंतर आज त्यांना फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. एकनाथ खडसेंना मनीष भंगाळे प्रकरणात नव्हे तर MIDC जमीन खरेदीप्रकरणात मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला, असं त्यांनी म्हटलं.
नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन आरोप केल्यानंतर आज त्याला फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. एकनाथ खडसेंना मनीष भंगाळे प्रकरणात नव्हे तर MIDC जमीन खरेदीप्रकरणात मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्यावर गुन्हा माझ्यामुळे नाही तर उच्च न्यायालयाच्या आदेशानं दाखल झाला, असं फडणवीस म्हणाले. दिल्लीत पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी एकनाथ खडसे, मराठा आरक्षण, कंगना रनौत, महाराष्ट्रातील कोरोना स्थिती अशा विविध विषयावर भाष्य केलं.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर मी काही टीका करणार नाही. मनीष भंगाळेबाबत ते बोलत आहेत, पण त्या प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला नाही, त्यांना MIDC प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. मनीष भंगाळे प्रकरणात खडसेंना क्लिन चीट आहे. त्या प्रकरणात त्यांना कुठेही राजीनाम द्यावा लागला नाही. कुटुंबीयांसाठी जमीन घेतल्याचा आरोप झाला, जमीन घेत असताना खडसे पदावर होते, त्यावर आम्ही चौकशी समिती नियुक्त केली. त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला.
उच्च न्यायालायने खडसेंवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले, तो गुन्हा मी दाखल केला नाही. विनाकारण लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचं कारण नाही, आमच्या ज्येष्ठ नेत्यांच्या तक्रारी घरातल्या घरात मिटवू, असंही ते म्हणाले.
कंगना सोडून कोरोनाकडे लक्ष द्या, देवेंद्र फडणवीसांचा सरकारला टोला
अख्खं सरकारी तंत्र कंगनाशी लढण्यासाठी उतरलं आहे. आता कोरोनाशी लढणं संपलं असून कंगनाशी लढाई सुरु आहे. या प्रकरणात जी काही चौकशी करायची ती करावी. कंगनानंही तसं सांगितलं आहे. मात्र कुठंतरी गांभीर्यानं कोरोनाकडे लक्ष देण्याची गरज आहे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.
जेवढ्या तप्तरतेने कंगनाची चौकशी करु, हे करु ते करु म्हणत आहात, त्यापेक्षा जास्त लक्ष कोरोनाकडे द्यायची गरज आहे. त्यापेक्षा 50 टक्के तरी क्षमता कोरोनावर खर्च करा, असं फडणवीस म्हणाले. मराठा आरक्षणासंदर्भात सरकार कमी पडलं, असंही ते म्हणाले.