विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात त्यांनी स्वत: ट्वीट करत माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी, असं देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात त्यांनी स्वत: ट्वीट करत माहिती दिली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, असा संकेत दिसतो. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी, असं देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 24, 2020
देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अतिवृष्टीग्रस्त भागात फिरत आहेत. तसंच बिहार निवडणुकीचे प्रभारी असल्या कारणाने त्यांचे बिहारचे देखील दौरे सुरु आहेत. शिवाय राज्यात थेट माणसांमध्ये जाऊन त्यांनी गाठीभेटी घेतल्या आहे.
दौऱ्यात अनेक नेते सोबतीला, भेटीगाठी झाल्या
फडणवीस यांच्या तीन दिवसांच्या अतिवृष्टी पाहणी दौऱ्याची बारामतीतून सुरुवात झाली. यावेळीस फडणवीस यांचं बारामती विमानतळावर राहुल कुल, खासदार रणजितसिंह निंबाळकर, रणजितसिंह मोहिते पाटील, जयकुमार गोरे, गोपीचंद पडळकर आणि प्रवीण दरेकर यांनी त्यांचं स्वागत केलं होतं. पुणे जिल्ह्यातील दौरा करून फडणवीसांनी हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापुरातील बंगल्यावर दुपारचं जेवण केलं होतं.
त्यानंतर पहिल्या दिवशी राणा जगजितसिंह पाटील यांच्या घरी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी बीडमध्ये जाऊन अचानक ताफा गोपीनाथ गडाकडे वळवला आणि मुंडेंचं दर्शन घेतलं. त्यावेळी सोबत पंकजा आणि प्रतिमा मुंडे होत्या. आंबेजोगाईच्या शेतकरी मेळाव्यात आमदार सुरेश धस आणि नमिता मुंदडा हे सोबत होते.
पुढे लातूर मधल्या औसामध्ये आमदार रमेश कराड यांच्या घरी जेवण केलं. मग गंगाखेड मध्ये रासपचे आमदार रत्नाकर गुट्टेंच्या फार्म हाऊसवर शेतकऱ्यांसोबत संवाद साधला होता. तर पुढे परभणीत मोहन फड यांच्या घरी सांत्वनाला फडणवीस गेले होते. त्या रात्री फडणवीसांनी मेघना बोर्डीकर यांच्या घरी मुक्काम केला होता.
बिहारमध्ये कार्यकर्त्यांची बैठक
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्वीटनुसार त्यांनी 22 तारखेला छपरा, मोतिहारी आणि समस्तीपुरमधील एनडीए कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. या बैठकीला त्यांनी संबोधित केलं होतं.